Shiv Sena Thackeray group beats up Mumbai rickshaw driver for anti-Marathi statement
मुंबई : राज्यामध्ये मराठी विरुद्ध हिंदी असा वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला प्राधान्य दिले पाहिजे अशी भूमिका मनसे आणि ठाकरे गटाकडून घेतली जात आहे. शालेय अभ्यासक्रमामध्ये हिंदी भाषेला विरोध करण्यात आला असून त्याचबरोबर मुंबईमध्ये हिंदी भाषा बोलण्याचा आग्रह धरणाऱ्या लोकांना दम दिला जात आहे. मनसे पक्षाकडून आक्रमक भूमिका घेत हिंदी भाषिकांना महाराष्ट्रामध्ये मराठी बोलण्याबाबत सांगण्यात येत आहे. यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी देखील मुंबईमध्ये मुजोर रिक्षा चालकाला चोप दिला आहे.
मराठीविरोधी वक्तव्य केल्याबद्दल शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एका रिक्षा चालकाला मारहाण केली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरही वेगाने व्हायरल होत आहे. रविवारी पोलिसांनी सांगितले की त्यांनी व्हिडिओ पाहिला आहे परंतु अद्याप या प्रकरणात कोणतीही औपचारिक तक्रार प्राप्त झालेली नाही आणि म्हणूनच अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र सोशल मीडियावर यावरुन उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या (यूबीटी) एका स्थानिक पदाधिकाऱ्याने दावा केला की मुजोरी दाखवणाऱ्या ऑटो चालकाला धडा शिकवण्यात आला आहे आणि मराठी भाषा आणि राज्याचा अपमान करणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही. पालघरच्या विरार भागात राहणाऱ्या स्थलांतरित ऑटो चालकाने मराठी भाषा, महाराष्ट्र आणि मराठी प्रतिकांविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप आहे, ज्याचा व्हिडिओ यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामुळे सोशल मीडिया आणि स्थानिक राजकीय गटांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली असून यामध्ये महिलांचा देखील समावेश आहे. रिक्षा चालकाला चप्पलने मारहाण करण्यात आली असून त्याला रस्त्यावर माफी देखील मागायला लावली आहे. त्याच्यासोबत असणाऱ्या त्याच्या बहिणीला देखील माफी मागण्यास सांगण्यात आले.
MNS वालों ने मराठी के नाम पर गुंडागर्दी की तो उद्धव ठाकरे के गुर्गे कहा पीछे रहते.. सरे राह अब एक ऑटो ड्राइवर को पीट डाला..ये कायरों का झुंड है..जो सैकड़ों की संख्या में जुटकर अकेले आदमी भड़ास निकाल रहे..ये डरपोक हैं..एक साथ 8-10 मेहनतकश मिल जाएं तो सामना नहीं कर पाएंगे pic.twitter.com/038TNi6vwi
— Gaurav Srivastava (@gauravnewsman) July 13, 2025
सदर घटनास्थळी उपस्थित असलेले शिवसेनेच्या विरार शहर युनिट ठाकरे गटाचे प्रमुख उदय जाधव यांनी शिवसैनिकांच्या या आक्रमक पवित्र्याचे समर्थन केले. “जर कोणी मराठी भाषा, महाराष्ट्र किंवा मराठी लोकांचा अपमान करण्याचे धाडस केले तर त्याला शिवसेना शैलीत योग्य उत्तर दिले जाईल. आम्ही शांत बसणार नाही,” असे जाधव यांनी सांगितले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले, “ड्रायव्हरने महाराष्ट्र आणि मराठी माणसांबद्दल वाईट बोलण्याचे धाडस केले. त्याला एक कठोर धडा शिकवण्यात आला. आम्ही त्याला राज्यातील लोकांची आणि त्याने दुखावलेल्यांची माफी मागण्यास सांगितले.” असे देखील उदय जाधव यांनी सांगितले आहे.
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही घटना शनिवारी घडल्याची पुष्टी केली, परंतु अद्याप कोणतीही औपचारिक तक्रार दाखल झालेली नाही असे सांगितले. “आम्ही व्हायरल व्हिडिओ पाहिला आहे आणि वस्तुस्थितीची पडताळणी करत आहोत, परंतु अद्याप कोणत्याही पक्षाकडून तक्रार आलेली नाही,” असे अधिकाऱ्याने सांगितले.