shivsena leader sushma andhare target mahayuti over political leader case
पुणे : भाजपचे नेते व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. साखर कारखान्यामध्ये बेसल डोस देण्याबाबत बॅंकेकडून 8 कोटी 86 लाखांचे कर्ज घेतले. मात्र नंतर शेतकऱ्यांना न देता या पैशांचा गैरवापर करण्यात आला. तसेच कर्जमाफीमध्ये हे कर्ज माफ करुन घेण्यात आले, असा आरोप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर करण्यात आला आहे. यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह 54 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावरुन शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी बॅकेमधील या घोटाळ्यावरील आरोपानंतर सुषमा अंधारे यांनी भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या की, “एकीकडे सीएम म्हणजे कॉमन मॅन आणि डीसीएम म्हणजे डेडिकेडेट कॉमन मॅन अशा वल्गना करणारे हे सरकार. नेमके सामान्य लोकांच्या तोंडाचा घास कसा काय हिरावून घेतो? याचा पुन्हा एकदा धक्कादायक खुलासा समोर येत आहे. आधी मंत्री धनंजय मुंडे मग जयकुमार गोरे, त्यानंतर माणिकराव कोकाटे, आणि आता प्रचंड मोठं साम्राज्य असणारे संस्थानिक राधाकृष्ण विखे पाटील यांनी सामान्य शेतकऱ्यांच्या नावावर, तब्बल 10 हजार शेतकऱ्यांच्या नावावर राष्ट्रीयकृत बॅंकेकडून कर्ज घेतले,” असा घणाघात सुषमा अंधारे यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे अंधारे म्हणाल्या की, “शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यांनी पैसे पडूच दिले नाहीत. आणि ते पैसे स्वतःकड़े वळते करुन घेतले. ही बाब अत्यंत लाजीरवाणी आहे. एवढ्या मोठ्या संस्थाचालक आणि संस्थानिक धनी असलेल्या माणसाने सामान्य शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास पळवावा हे अत्यंत वाईट आहे. महायुती सरकारसाठी ही शरमेने मान खाली घालणारी बाब आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार लोणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा सुद्धा दाखल झाला. परंतू इतक्या भ्रष्ट माणसाला, शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास पळवणाऱ्या मंत्र्याला महायुतीच्या सरकारमध्ये चालतो कसा काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा घ्यावा,” अशी मागणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.
सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवणाऱ्या धनिक आणि संस्थानिक असणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी तात्काळ आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा.@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @ShivSenaUBT_ @PTI_News pic.twitter.com/v22F7bSOO4
— SushmaTai Andhare (@andharesushama) April 29, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नेमकं काय आहे प्रकरण?
प्रवरा सहकारी साखर कारखान्याने 2004-05 आणि 2007 या कालावधीत बेसल डोसचे पैसे वाटप करण्याच्या कारणावरून जवळपास 9 कोटी रुपयांचे कर्ज राष्ट्रीयकृत बँकेकडून घेतले. मात्र, या कर्जातून शेतकऱ्यांना लाभ न देता निधीचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच, हे कर्ज शेतकऱ्यांच्या नावावर कर्जमाफी योजनेतून माफ करून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, प्रवरा साखर कारखान्याचे तत्कालीन संचालक, साखर आयुक्त तसेच संबंधित बँकांचे अधिकारी अशा एकूण ५४ जणांविरोधात लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.