Photo Credit- Social Media भाजपचे माजी आमदार रामदास आंबटकर यांचे निधन
विधान परिषदेचे माजी आमदार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान स्वयंसेवक रामदास आंबटकर यांचे आज (मंगळवार) दुपारी चेन्नई येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांना मागील पंधरा दिवसांपासून श्वसनाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती अधिक खालावल्यामुळे त्यांना चेन्नईतील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
रामदास आंबटकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ कार्यकर्ते होते आणि त्यांनी संघामध्ये विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. संघाच्या कार्यातूनच त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला आणि ते विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले. त्यांच्या निधनाची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी दिली. त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण संघ परिवार आणि भारतीय जनता पक्षात शोकाची लाट पसरली आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी आंबटकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करत X (माजी ट्विटर) या समाजमाध्यमावर श्रद्धांजली वाहिली आहे.
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडे दुहेरी आनंद! वर्षा बंगल्यात प्रवेश करत दिली ‘Good News’
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून राजकीय प्रवासाची सुरुवात
डॉ. रामदास भगवान आंबटकर यांना सुरुवातीला श्वसनासंबंधी त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे उपचार सुरू असतानाच आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांचा जन्म 1 जुलै 1960 रोजी वर्धा जिल्ह्यातील वडनेर या लहानशा गावात झाला. त्यांचे वडील भारतीय जनता पक्षाचे तीन वेळा जिल्हाध्यक्ष होते आणि आयुष्यभर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीशी एकनिष्ठ राहिले. वडिलांकडूनच मिळालेल्या प्रेरणेतून डॉ. आंबटकर यांनी राष्ट्रसेवा आणि लोकहितासाठी आपले जीवन समर्पित करण्याचा संकल्प केला.
शालेय जीवनात असतानाच, 1965 मध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय सहभाग घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी सातत्याने आणि निष्ठेने संघकार्य करत अनेक जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या. संघाच्या कार्यातूनच त्यांनी राजकारणात प्रवेश करत विधायक कारकिर्दीची सुरुवात केली.