
Show cause notice from state president Sunil Tatkare in the case of lavani dance at NCP Nagpur office
NCP Office Dance Video: नागपूर : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यालयातील व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. पक्षाच्या कार्यालयामध्ये डान्स सुरु असल्यामुळे जोरदार टीका करण्यात आली. राष्ट्रवादीच्या घडाळ्यापुढे महिला वाजले की बारा या गाण्यावर नाचत होत्या, यामुळे सर्व स्तरातून टीका झाली. पक्षाचे कार्यालय नक्की कामासाठी आहे की नाचण्यासाठी असे प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केले. यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटावर नाराजी व्यक्त करण्यात आली. या प्रकरणामुळे आता पक्षाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. संबंधितांना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेली सदर व्हिडिओ ही नागपूरमधील आहे. नागपूरमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यालयात आयोजित दिवाळी मिलन कार्यक्रमात ‘वाजले की बारा’ या प्रसिद्ध लावणीवर सादर झालेले नृत्य सोशल मीडियावर व्हायरल झाले. पक्षाच्या पदाधिकारी शिल्पा शाहीर यांनी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पोस्टर्ससमोर हे नृत्य सादर केले. उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला. तसेच पक्ष कार्यालयातील या लावणीला वन्स मोर देखील मिळाला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मात्र, पक्ष कार्यालयातील हा प्रकार राजकीय वर्तुळात वादग्रस्त ठरला आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत कठोर कारवाईचा इशारा दिला. दुसरीकडे, नागपूर शहर अध्यक्ष अनिल अहिरकर यांनी लावणी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा असल्याचे समर्थन केले. ते म्हणाले, “शिल्पा शाहीर या पक्षाच्या पदाधिकारी आणि कलाकार असून, मुख्यमंत्र्यांसमोरही लावण्या सादर होतात. तरीही, पक्षश्रेष्ठींकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे.
NAGPUR | अजित पवारांच्या राष्ट्रवादी कार्यालयात लावणी? व्हायरल व्हिडीओने खळबळ #Politics #ViralVideo #Viral #SocialViral #NCP #AjitPawar #Nagpur #MaharashtraNews #Lavani #ViralDance pic.twitter.com/fo8Tvt2mNQ — Navarashtra (@navarashtra) October 28, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी अनिल अहिरकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या घटनेमुळे राष्ट्रवादीच्या कार्यालयातील कार्यक्रम तमाशाच्या फडाशी जोडला जाऊ लागला असून, पक्षांतर्गत आणि बाहेरही चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, लावणी सादर करणाऱ्या महिलेने म्हटले आहे की, त्या मैत्रिणीसोबत या कार्यक्रमाला गेल्या होत्या. लावणी नृत्य येत असल्याने त्यांना सादरीकरण करण्याची विनंती केली गेली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूरचे शहर अध्यक्ष अनिल अहिरकर यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. लावणी सादर करण्यासाठी कोणत्याही बाहेरच्या कलाकरांना बोलवले गेले नव्हते.