खासदार संजय राऊत यांनी यांनी अमित शाह यांनी भूमिपूजन केलेल्या मुंबई चर्चगेट भाजप कार्यालयाच्या जमिनीवर संशय घेतला (फोटो - सोशल मीडिया)
BJP Mumbai Office land: मुंबई : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर आले आहेत. मुंबईत महाराष्ट्र भाजपाच्या नवीन कार्यालयाचे भूमिपूजन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते झाले. भाजपकडून देशातील प्रमुख शहरांमध्ये कार्यालय उभारण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील चर्चगेट परिसरामध्ये कार्यालयाचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र या भाजपच्या नवीन कार्यालयाच्या जमीनीवरुन वाद निर्माण झाला आहे. विरोधकांनी ही जमीन भाजपने जोरजबरदस्ती करुन घेतली असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मरीन लाईन्स येथील या कार्यालयाच्या जागेसंदर्भात मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. खासदार संजय राऊत यांनी अमित शाह यांना पत्र लिहून प्रशासकीय नियम धाब्यावर बसवून हा भूखंड ताब्यात घेतल्याचा दावा केला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार संजय राऊत यांनी भाजप कार्यालयावरुन टीकास्त्र डागले आहे. खासदार राऊत म्हणाले की, मरीन लाईन्स एक्साईडजवळील मोक्याचा भूखंड ‘एकनाथ रिॲल्टर्स’ने अवघ्या ११ दिवसांत ताब्यात घेतला. हा भूखंड मूळ महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह फायनान्स कॉर्पोरेशनकडे होता. एकनाथ रिॲल्टर्सला ४६ टक्के भाडेपट्टा मिळाला असताना, उर्वरित ५४ टक्के जागेसाठी अर्ज करताच तत्काळ मंजुरी मिळाली. २१ कोटींहून अधिक हस्तांतरण अधिमूल्य आणि ३ कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरून हा व्यवहार घाईघाईत पूर्ण झाला, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले की, “मुंबई महापालिकेत भाजपच्या मर्जीतील प्रशासक असल्याने नागरिकांच्या विकास प्रस्तावांकडे दुर्लक्ष होत असताना ही फाईल वेगाने फिरवण्यात आली, असा राऊत यांचा आरोप आहे. प्रशासन आणि एकनाथ रिॲल्टर्स यांनी संगनमत करून हा व्यवहार मध्यरात्रीत भाजपच्या पदरात पाडला, असे राऊत यांनी पत्रात नमूद केले. याप्रकरणी गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी,” अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
याबाबत आमदार रोहित पवार यांनी देखील सोशल मीडिया पोस्ट करुन संशय घेतला. रोहित पवार यांनी लिहिले आहे की, “आज मुंबईत भूमिपूजन होत असलेल्या भाजपा कार्यालयाची जागा Lease Land असल्याचे, Shedule W ची जागा असल्याची तसेच lease renovation झाले नसल्याची माहिती समोर येत आहे. Lease Land, Shedule W असलेली जागा lease renovation झाले नसल्यास विकता येते का? याचा खुलासा पालिका आयुक्त करतील का? Lease Land, Shedule W जागा विकण्याचा पायंडा पाडला जाणार असेल तर उद्या महालक्ष्मी रेसकोर्स सारख्या अनेक महत्वपूर्ण जागा देखील खाजगी लोकांच्या घशात घातल्या जातील का? पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरण दाबण्यासाठी ज्याप्रकारे सर्व मिडीया हाऊसेसला फोन करण्यात आले तसेच फोन आज मुंबईतील या जागेसाठी करण्यात आल्याचे देखील समजत आहे. त्यामुळे हे प्रकरण देखील गंभीर असून आयुक्तांनी खुलासा करण्याची गरज आहे. आयुक्तांनी खुलासा न केल्यास उद्या आम्ही आयुक्तांची भेट घेऊन या प्रकरणाची फाईल दाखवण्याची मागणी करू,” असे रोहित पवार म्हणाले आहेत.






