Vidhansabha 2024: गुहागरमध्ये शरद शिगवण यांना उमेदवारी मिळावी, शिवसेना-कुणबी समाजाकडून होतेय मागणी
चिपळूण / संतोष सावर्डेकर :- विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर गुहागरच्या राजकारणातील हलचालींना वेग येत असल्याचं पाहायला मिळत आहे.
चिपळूण मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे पंचायत समितीचे माजी सभापती आणि ओबीसी नेते शरद शिगवण यांना उमेदवारी मिळावी, अशी मागणी शिवसेना व कुणबी समाजाकडून होत आहे. उमेदवारी अर्ज भरायला काही दिवस शिल्लक असतांनाच गुहागर मतदारसंघातील जागेचा तिढा शिगवण यांना उमेदवारी देऊन सोडवावा अशी मागणी होत आहे.
हेही वाचा-19 वर्षानंतर राणे पुन्हा शिवसेनेत! कुडाळच्या जागेवर धनुष्यबाण चिन्हावर विधानसभा लढविणार?
राज्याची विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीतर्फे शिवसेना नेते आ. भास्कर जाधव आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, भाजपने पहिल्या टप्प्यात उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र, यादीत रत्नागिरी जिल्ह्यातील एकाही जागेचा समावेश नसल्याने भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. या जागेवर भाजपकडून माजी आमदार डॉ. विनय नातू, संतोष जैतापकर यांची नावे चर्चेत असतांना तर शिवसेना ( शिंदे गटाकडून ) विपुल कदम तर आता राजेश बेंडल यांचे नाव पुढे येत आहे.
हेही वाचा-विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची पहिली यादी जाहीर, राज ठाकरेंकडून ‘या’ दोन शिलेदारांच्या नावाची घोषणा
मात्र, गुहागर विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेचे कडवट शिवसैनिक चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती व 72 गावातील ओबीसी चेहरा असलेले शरद शिगवण यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी शिवसेना व कुणबी समाजाकडून होत आहे. जेणेकरून या मतदार संघात नवा चेहरा, नवे नेतृत्व उदयास येईल. शिगवण यांचे महायुतीतील सर्वच पक्षांशी सलोख्याचे संबंध आहेत. विशेष म्हणजे सभापती पदाचा कार्यभार सांभाळलेला असल्याने त्यांना विकासाची जाण आहे. वक्तृत्वावर उत्तम पकड आहे. संघटन कौशल्य देखील उत्तम असून या मतदारसंघात आ. भास्कर जाधव यांना कडवी लढत देऊन विजय मिळवू शकतात, असा जनतेमध्ये मोठा मतप्रवाह आहे. यामुळे या मागणीचा विचार व्हावा, अशी मागणी जोर धरत आहे