
पंढरपुरात नगराध्यक्षपदासाठी होणार तिरंगी लढत
पंढरपूर : पंढरपूर नगरपरिषदेची निवडणूक तिरंगी होणार असून, उमेदवारी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी भाजपकडून शामल शिरसट तर आमदार अभिजित पाटील गटाच्या विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीकडून सारिका साबळे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. शेवटपर्यंत गुप्तता बाळगून असलेल्या भाजपकडून साधना भोसले व वैशाली वाळूजकर यांना डावलले असून, प्रणिता भालके, शामल शिरसट व सारिका साबळे यांच्यात नगराध्यक्ष पदासाठी लढत होणार आहे.
यंदाची पंढरपूर नगरपरिषदेची निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिलेस आरक्षित झाल्याने इच्छुकांची संख्या वाढली होती. भाजपकडून इच्छुकांची संख्या अधिक असल्याने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी मोठी आहे. लॉबिंग लावण्यात येत होती. यामध्ये माजी नगराध्यक्ष साधना भोसले, वैशाली वाळुजकर तसेच शामल शिरसट यांच्यात उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू होती. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत भाजपकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करण्यात आला नव्हता. यामुळे निवडणुकीत मोठा सस्पेंस वाढला होता. अखेर भाजपकडून शामल शिरसट यांना उमेदवारी दिली गेल्याने भाजपकडील मोठा पेचप्रसंग सुटला.
हेदेखील वाचा : “सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर…”: महायुती फुटणार? ‘या’ नेत्याच्या विधानाने खळबळ
दरम्यान, आमदार अभिजित पाटील हे उमेदवारांच्या मुलाखतीपासून निवडणुकीच्या रिंगणातून गायब होते. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्यदिवशीच उगवले आहेत. श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आमदार अभिजित पाटील हे पंढरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत उत्तरले आहेत. नगराध्यक्षपदासाठी सारिका साबळे यांचे नाव जाहीर करत त्यांनी निवडणुकीत रंगत आणली आहे. आमदार पाटील यांच्या शांत बसण्याच्या भूमिकेमुळे शहरात तर्कवितर्काना उधाण आले आहे. निवडणुकीपूर्वी गरजणारे आमदार पाटील शांत का झाले याबाबत उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.
भाजपकडून जातीय समीकरणाचा मेळ
भारतीय जनता पक्षाने यंदाच्या निवडणुकीत राजकीय समीकरण राखण्यात यश मिळवले आहे. ओबीसी समाजातील शामल शिरसट यांना उमेदवारी देत ओबीसी समाज घटकाला न्याय देत राजकीय समीकरण जुळवले आहे.
तीर्थक्षेत्र विकास आघाडीत भालके, धोत्रे, सावंत, भोसलेंचा समावेश
भगीरथ भालके यांच्या नेतृत्वात तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून पंढरपूर नगरपरिषदेची निवडणूक लढवली जात आहे. यामध्ये भगीरथ भालके, चेअरमन अनिल सावंत, नागेश भोसले, मनसेचे दिलीप धोत्रे यांचा समावेश आहे.
नगराध्यक्षपदासाठी ८ तर नगरसेवकपदासाठी ३६६ अर्ज
पंढरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी आठ उमेदवारी अर्ज दाखल झले असून, नगरसेवक पदासाठी तब्बल ३६६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. १८ रोजी अर्जाची छाननी होणार असून, १८ ते २१ नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारीचा दिवस असून २१ नोव्हेंबर रोजी लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.