मुंबई: राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज (सोमवारी) सकाळी भेट झाली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या असतानाच, उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर आणि माजी मंत्री सुभाष देसाई देखील मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भेटीसाठी पोहोचले आहेत.
उद्धव ठाकरे पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक साधत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यातच, उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी मिलिंद नार्वेकर आणि माजी मंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने काही महत्त्वाचे राजकीय घडामोडी घडत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
भोरमध्ये भीषण आग, अनेक दुकाने जळून खाक; दुकानदारांचं मोठं नुकसान
या भेटीत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील सहभागी असल्याने ही भेट राजकीय कारणांसाठी होती की अन्य काही कारणांसाठी, याबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही. मात्र, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) भाजपसोबत संबंध सुधारण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
उद्धव ठाकरे यांनी नुकतीच मुंबईत जाहीर सभा घेतली होती. या सभेत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. मात्र, याआधी विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांना “टरबूज” असे संबोधणारे उद्धव ठाकरे यावेळी मात्र त्यांच्यावर कोणतीही टीका न करता, त्यांचा उल्लेख “देवाभाऊ” असा केला. त्यामुळे दोघांमधील संबंध सुधारण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ST Mahamandal: परिवहन महामंडळात अंतिम निर्णय माझाच, प्रताप सरनाईक यांचे वक्तव्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील भेटीत राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना विधान परिषदेत संधी देण्याबाबत चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, स्वतः फडणवीस यांनी स्पष्ट केले की, ही भेट सदिच्छा भेट होती आणि त्यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही.
अमित ठाकरे आमदार झाल्यास भाजप-मनसे युतीची शक्यता वाढेल का? हा देखील चर्चेचा विषय आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने भाजपविरोधात भूमिका घेतली होती, मात्र गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही पक्षांमध्ये सलोखा वाढल्याचे दिसत आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीतील प्रत्यक्ष चर्चा काय झाल्या, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी भाजप आणि मनसेमधील संबंध सुधारत असल्याचे संकेत यातून मिळत आहेत. पुढील काही दिवसांत या राजकीय हालचालींचा काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.