नेमका धनखडांनी राजीनामा का दिला (फोटो सौजन्य - विकीपीडिया)
देशाला लवकरच नवीन उपराष्ट्रपती मिळणार आहे. जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर अनेक अटकळ बांधले जात आहेत. धनखड आणि केंद्र सरकारमधील अंतराबद्दलही अनेक दावे केले जात आहेत. हिंदुस्तान टाईम्समधील एका वृत्तानुसार, माजी उपराष्ट्रपती धनखड यांना राजीनामा देण्याआधी दोन केंद्रीय मंत्र्यांचा फोन आला होता. हे संपूर्ण प्रकरण न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याभोवती फिरत असल्याचे दिसते असा दावा यात करण्यात आला आहे.
सरकार आणि विरोधी पक्ष दोघेही न्यायमूर्ती वर्मा यांच्याबाबत प्रस्ताव आणण्याच्या तयारीत होते, परंतु धनखड यांनी विरोधकांचा प्रस्ताव औपचारिकपणे स्वीकारला असे आता समोर आले आहे. यावरूनच राजीनामा प्रकरण घडल्याचा तर्क लावण्यात येत आहे.
धनखड यांचा राजीनामा
जगदीप धनखड यांनी सोमवारी (२१ जुलै) संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राजीनामा जाहीर केला. त्यांनी आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा देणार असल्याचे सांगितले. परंतु अहवालात वेगळेच काही असल्याचा दावा करण्यात आला आहे. धनखड यांनी न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध विरोधकांचा प्रस्ताव औपचारिकपणे स्वीकारला. तर त्यांनी केंद्र सरकारच्या प्रस्तावाबाबत कोणतेही आश्वासन दिले नाही. अहवालात असा दावा करण्यात आला आहे की केंद्रीय मंत्र्यांनी या मुद्द्याबाबत धनखड यांना फोन केला होता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील त्यांच्या निर्णयावर खुष नसल्याचे म्हटले आहे. एकंदरीतच या राजीनाम्यानंतर धनखड यांनी पंतप्रधानांंचीही नाराजी ओढवून घेतली आहे.
उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची निवडणूक आयोगाकडून तयारी; लवकरच तारीख जाहीर केली जाणार
धनखड यांनी फोनवर काय उत्तर दिले?
अहवालानुसार, केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी माजी उपराष्ट्रपती धनखड यांच्याशी चर्चा केली होती. न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध आणलेल्या प्रस्तावानंतर हे घडले. त्यावर ६३ खासदारांनी स्वाक्षरी केली होती. धनखड यांच्या निर्णयाने सरकार आश्चर्यचकित झाले असल्याचेही सांगण्यात येत आहे. केंद्र सरकारकडून धनखड यांना फोन आला तेव्हा त्यांनी सांगितले की ते योग्य नियमांनुसारच काम करत आहेत.
राष्ट्रपती भवनात पोहचून राजीनामा
यानंतर उपराष्ट्रपती धनखड अचानक राजीनामा घेऊन राष्ट्रपती भवनात पोहोचले. सहसा उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती यांच्यातील बैठक आधीच ठरलेली असते. यासंदर्भात संपूर्ण प्रोटोकॉल पाळला जातो, परंतु धनखड यांनी तसे केले नाही. राष्ट्रपतींना भेटल्यानंतर त्यांनी राजीनामा जाहीर केला. त्यामुळे अजूनही यावर वेगवेगळी चर्चा होताना दिसून येत आहे. धनखड यांचा राजीनामा हा देशभरातील चर्चेचा विषय ठरला आहे. याविषयी आता केवळ योग्य माहिती काय आहे हे धनखड यांनाच माहीत. पण अखेर त्यांचा राजीनामा त्वरीत मंजूर झाला असून देशाला दुसरे उपराष्ट्रपती लवकरच मिळतील.
उपराष्ट्रपती पदावरुन जगदीप धनखड का झाले पायउतार? राजीनाम्याबाबत संशयाचा वास