उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची निवडणूक आयोगाकडून तयारी; लवकरच तारीख जाहीर केली जाणार (फोटो सौजन्य-X)
नवी दिल्ली : जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर आता निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपती निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे. आयोगाने बुधवारी ही माहिती दिली. आयोगाने सांगितले की, गृह मंत्रालयाने 22 जुलै रोजी धनखड यांच्या राजीनाम्याची माहिती दिली. त्यामुळे आता उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीशी संबंधित तयारी सुरू झाली आहे. निवडणुकीची तारीख लवकरच जाहीर केली जाईल.
संविधानाच्या कलम ६८ अंतर्गत, उपराष्ट्रपतिपद रिक्त झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर निवडणुका घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे, नियमांनुसार ही प्रक्रिया लवकर पूर्ण करावी लागते. या संदर्भात, निवडणूक आयोगाने आता एक अधिसूचना जारी केली आहे. उपराष्ट्रपतींची निवड इलेक्टोरल कॉलेजद्वारे केली जाते, ज्यामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांचे (लोकसभा आणि राज्यसभा) निवडून आलेले आणि नामांकित सदस्य असतात. उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला किमान २० प्रस्तावक आणि २० समर्थक (निर्वाचक मंडळाचे सदस्य) यांचे समर्थन आवश्यक असते. त्यांना नामांकनासोबत ५०००० रुपयांची सुरक्षा रक्कम देखील जमा करावी लागते.
हेदेखील वाचा : सभागृहातील गेम करणार का माणिकराव कोकाटेंचा ‘Game’? हातातून जाणार खातं, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
दरम्यान, उपराष्ट्रपती बनण्यासाठी उमेदवार भारताचा नागरिक असावा. वय किमान ३५ वर्षे असावे. तो राज्यसभेचा सदस्य होण्यास पात्र असावा. तो राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल किंवा केंद्र/राज्य सरकारचे मंत्री पद वगळता कोणतेही लाभाचे पद धारण करू शकत नाही.
वैद्यकीय कारणास्तव दिला होता राजीनामा
जगदीप धनखड यांनी वैद्यकीय कारणास्तव उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून आपल्या पदाचा राजीनामा दिला. धनखड यांनी २०२२ मध्ये उपराष्ट्रपतिपदाची शपथ घेतली होती. त्यांचा कार्यकाळ २०२७ पर्यंत होता. मात्र, हा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला आहे.
हेदेखील वाचा : Parliament Monsoon Session 2025: संसदेचा तिसरा दिवसही वादळी; SIRवरून विरोधक आक्रमक
उपराष्ट्रपतिपदासाठी अनेक नावं चर्चेत
भाजपच्या अंतर्गत गोटात देखील काही वरिष्ठ नेत्यांची नावे पुढे येत आहेत. यात जे.पी. नड्डा, निर्मला सीतारमण, नितीन गडकरी, मनोज सिन्हा आणि वसुंधरा राजे यांचा समावेश आहे. मात्र, या कोणत्याही नावामध्ये सर्व राजकीय समीकरणे संतुलित करण्याची क्षमता दिसून येत नसल्याची चर्चा आहे. मार्च 2025 मध्ये जे.पी. नड्डा यांचा भाजप अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला आहे. पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध त्यांना एक संभाव्य उमेदवार बनवतात. मनोज सिन्हा यांचे नाव देखील झपाट्याने पुढे येत असले, तरी जातीय समीकरण त्यांच्या बाजूने नसल्याचे बोलले जाते.