
eknath shinde virat kohli
भारतीय क्रिकेटचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लंडनमध्ये भेट झाली. शुक्रवारी झालेल्या या भेटीत क्रिकेटपुरतीच चर्चा मर्यादित राहिली नाही, तर महाराष्ट्रातील विकासकामं, पायाभूत सुविधा आणि सरकारच्या विविध योजनांवरही दोघांमध्ये चर्चा झाली.
एकनाथ शिंदे यांनी या भेटीनंतर विराट कोहलीचं तोंडभरून कौतुक केलं. एवढा मोठा क्रिकेटपटू असूनही विराटचा स्वभाव अतिशय साधा आणि जमिनीवर पाय असलेला असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.
शिंदे यांच्या म्हणण्यानुसार, आपण लंडनमध्ये असल्याचं विराटला समजल्यानंतर तो स्वतः भेटण्यासाठी आला. याआधीही दोघांची भेट झाली होती; मात्र यावेळी झालेली थेट चर्चा विशेष ठरल्याचं शिंदे यांनी सांगितलं.
या भेटीत महाराष्ट्रातील विविध विकासकामांचा मुद्दाही चर्चेत आला. थर्ड मुंबई प्रकल्प, अटल सेतू, बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, मेट्रो यांसह शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांची माहिती शिंदे यांनी विराटला दिली. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत झालेल्या विकासकामांबाबत विराटनेही सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचं शिंदे यांनी सांगितलं.
विशेष म्हणजे, नव्या पिढीतील खेळाडूंना पुढे आणण्यासाठी काय करता येईल, त्यांच्या टॅलेंटला योग्य व्यासपीठ कसं मिळेल, यावरही चर्चा झाली. विराटने याबाबत काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्याचं शिंदे यांनी सांगितलं.
दरम्यान, विराट कोहली सध्या आणखी एका मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतकांचा टप्पा गाठण्याच्या दिशेने त्याची वाटचाल सुरू आहे. सध्या विराटच्या नावावर 85 आंतरराष्ट्रीय शतकं आहेत.
वनडे क्रिकेटमध्येही विराटच्या नावावर तब्बल 14,941 धावा आहेत. त्यामुळे 15 हजार वनडे धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला आता फक्त 59 धावांची गरज आहे. आगामी सामन्यांमध्ये विराटच्या बॅटमधून या धावा कधी निघतात, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.