हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर घणाघाती हल्ला
मुंबई : महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करत थेट त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. “महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंबही सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?” असा सवाल करत सपकाळ यांनी सरकारला धारेवर धरलं.
महाराष्ट्र पोलिसांचा एकेकाळी मोठा दबदबा होता. मात्र गेल्या काही वर्षांत पोलिसांच्या प्रतिमेला धक्का बसला असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. पोलिसांचा वापर राजकीय विरोधकांवर दबाव आणण्यासाठी आणि वसुलीसाठी होत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. राज्यातील या परिस्थितीला देवेंद्र फडणवीस यांचा कारभार जबाबदार असल्याचं सपकाळ म्हणाले.
मंत्री अतुल सावे यांच्या भाऊ आणि पुतण्यावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झालेल्या हल्ल्याचा दाखला देत सपकाळ यांनी सरकारला सवाल केला. याआधी जळगावमध्ये केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढल्याच्या घटनेचाही त्यांनी उल्लेख केला. “मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य माणसाने कुणाकडे पाहायचं?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Paithan: मंत्री अतुल सावेंच्या मोठ्या भावासह पुतण्याला मारहाण; शेती-रस्त्याच्या वादातून घटना
राज्यात गुंडगिरी, ड्रग्ज आणि गँगस्टरचा मुद्दाही सपकाळ यांनी उपस्थित केला. राजकीय आश्रयामुळे गुंड आणि मवाली खुलेआम फिरत असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘ड्रग्ज फ्री महाराष्ट्र’च्या घोषणा करून प्रश्न सुटणार नाही; त्यासाठी ठोस राजकीय इच्छाशक्ती लागते, असा टोला त्यांनी लगावला.
पुणे पोलिसांच्या कारवाईचा मुद्दा उपस्थित करत सपकाळ यांनी सरकारवर आणखी निशाणा साधला. अल्पवयीन आरोपींना कारच्या बॉनेटवर बसवून धिंड काढल्याप्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाने केलेल्या शिफारशीचा त्यांनी उल्लेख केला. पुणे पोलिसांवरील ही कारवाई फडणवीसांच्या कारभाराची पावती असल्याचं ते म्हणाले.
अहिल्यानगर आणि जालना जिल्ह्यातील कथित मारहाणीच्या घटनांचाही सपकाळ यांनी उल्लेख केला. गोरक्षणाच्या नावाखाली नागरिकांना अमानुष वागणूक दिल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर टीका केली. राज्यात गुन्हेगारांना कायद्याची भीती उरलेली नाही, असा दावा त्यांनी केला.
एकूणच, महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेवरून काँग्रेसने महायुती सरकारला पुन्हा एकदा लक्ष्य केलं असून गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले आहेत, त्यांनी खुर्ची सोडावी, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.






