
Uday Samant
धुळ्यात बोलताना उदय सामंत यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना घरचा आहेर दिला. गटबाजी सोडून संघटना मजबूत करा. कार्यकर्त्यांना तुमच्या आपापसातील राजकारणात भरडू नका, असं त्यांनी सुनावलं.
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात आज पक्षाचा फक्त एक आमदार आहे आणि आपणच दुसऱ्यांना संधी देत असल्याचं सामंत म्हणाले. नंदुरबारमध्ये दोन हजार पदाधिकारी उपस्थित राहतात, मात्र धुळ्यात ५० कार्यकर्तेही आणता आले नाहीत. “आपण साहेबांना फसवतोय का?” असा सवाल करत पदाधिकाऱ्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात पक्षासंदर्भातील सर्वाधिक तक्रारी धुळ्यातून येत असल्याचंही सामंत यांनी नमूद केलं.
“चांगलं काम करा, ही तुम्हाला शेवटची संधी आहे. अन्यथा धुळ्यात नवीन प्रयोग करून नवीन टीम उभी करण्यात येईल,” असा इशारा उदय सामंत यांनी दिला.
डीपीसीमध्ये शिवसेनेचे चार सदस्य आणि विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे असायला हवं, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मनोज मोरे आणि सतीश महाले यांनी एकत्र येऊन संघटनेचं काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
सामंत यांनी पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांचं महत्त्वही पटवून दिलं. कार्यकर्ते आहेत म्हणून आपण आहोत. साहेबांसोबत कार्यकर्त्यांचे फोटो काढा. संपूर्ण हॉल शिवसैनिकांनी भरला तरच पक्षाची खरी ताकद दिसेल, असं ते म्हणाले.
तसंच, “एकनाथ शिंदेंमुळेच तुमचं अस्तित्व आहे,” असं सांगत कार्यकर्त्यांना अंतर्गत राजकारणात भरडू नका, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. त्यामुळे धुळ्यातील शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत वादावर आता पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.