
Eknath Shinde house of Lords
Eknath Shinde : ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ या प्रतिष्ठेच्या सन्मानाने त्यांना गौरवण्यात आलं. विशेष म्हणजे, या ऐतिहासिक सभागृहात शिंदेंनी आपल्या भाषणाची सुरुवातच ‘नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र’ अशा मराठी शब्दांनी केली.
यावेळी त्यांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत महाराष्ट्राची ओळख ब्रिटनच्या संसदेत मांडली. सुरेश भट यांच्या ‘लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी…’ या कवितेच्या ओळीही त्यांनी आपल्या भाषणात उद्धृत केल्या.
आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी आपल्या बालपणीच्या आठवणी सांगताना आई आणि पत्नीने केलेल्या कष्टांचा विशेष उल्लेख केला. सर्वसामान्यांच्या अडचणी आणि त्यांच्या डोळ्यातील अश्रू समजून घेण्याची संवेदनशीलता याच अनुभवातून आली, असं त्यांनी सांगितलं.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबवण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आणि सरकारी सेवा नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ या योजनांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक मदत नसून महिलांच्या सबलीकरणासाठीची योजना असल्याचं त्यांनी सांगितलं.
मुंबई आणि लंडन ही जगातील महत्त्वाची आर्थिक केंद्रं असून फिनटेक, ग्रीन एनर्जी, ग्रीन हायड्रोजन, डीप-टेक आणि कौशल्य विकास क्षेत्रात महाराष्ट्र आणि ब्रिटनमध्ये सहकार्याची मोठी संधी असल्याचं शिंदे म्हणाले.
यावेळी त्यांनी वाढवण बंदर, समृद्धी महामार्ग, अटल कोस्टल ब्रिज आणि मुंबई कोस्टल रोड यांसारख्या प्रकल्पांचाही उल्लेख केला. 2030 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचं लक्ष्य असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, हा सन्मान केवळ आपला नसून महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या कष्टांचा आणि आकांक्षांचा गौरव असल्याचं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. भारत-ब्रिटन संबंध, महाराष्ट्रातील विकासकामं आणि नागरिक-केंद्री प्रशासनाचा दृष्टिकोन यावरही त्यांनी यावेळी भाष्य केलं.