सुधाकर बडगुजर यांच्या भाजपप्रवेशावर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचं मोठं विधान; 'बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल...'
नागपूर : ‘प्रफुल्ल पटेल, धर्मराव बाबा आत्राम काय बोलले, हे मला माहीत नाही. पण भाजपची भूमिका आहे की, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत लढायच्या. निवडणुका लागल्यावर आम्ही बसणार आहोत. मुंबईपासून ते नागपूरपर्यंत सर्व निवडणुका महायुतीत लढणार आहोत, स्थानिक स्तरावर काही चर्चा होत आहे की आम्ही वेगळं लढू. पण महायुतीचा निर्णय हाच आहे की आम्ही एकत्र लढू’, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी नागपुरात विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘आमच्या शेतातील रस्त्यावरून बैलगाडी, ट्रॅक्टर गेला पाहिजे, अशी मागणी गेल्या 40 वर्षांपासून शेतकऱ्यांची होती. यासाठी पाणंद रस्त्यावर अतिक्रमण झालं, ते काढण्याची मागणी होती. ती मान्य झाली आहे. त्यामुळे आता महसूल विभाग या निर्णयाची अंमलबजावणी करतील. औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी चांगलं काम केलंय. शेतकऱ्यांना शेतात दोन पीक घेण्यासाठी, त्यांना पावसाळ्यात शेतात जाण्यासाठी चांगले रस्ते 12 फुटांचे होणार आहे’, असेही प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
दरम्यान, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीवरही त्यांनी भाष्य केले. मुख्यमंत्र्यांनी पावसाच्या नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. ‘मी पण काल व्हीसीद्वारे सर्व जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली. पंचनामे होऊन सर्वांना मदत मिळेल’, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.
आता टीकाटिप्पणीचे दिवस नाहीत
याशिवाय, धर्मराव बाबा आत्राम महायुतीचं सर्वांनी इमानदारीने काम केलंय. 288 आमदार निवडून आणण्यासाठी आम्ही जिवाचं रान केलंय. धर्मरावबाबा आत्राम यांना निवडून आणण्यासाठी मी दोन बैठका घेतल्या. यांनी काम केलं नाही, त्यांनी काम केलं नाही, असं बोलण्याचे दिवस नाही. आजचा दिवस आहे की, आपल्या सरकारने लोकांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या. आता टीकाटीप्पणीचे दिवस नाही, असे बावनकुळे यांनी सांगितले.
लाडक्या बहिणीच्या योजनेचं हेड वेगळं
मला हे समजत नाही, कोण या बातम्या पेरतात. संभ्रम निर्माण करतात. लाडक्या बहिणीच्या योजनेचं हेड वेगळं आहे आणि आदिवासी समाजाच्या निधीचं हेड वेगळं आहे. सामाजिक न्यायचं वेगळं आहे. त्यामुळे इकडचे तिकडे करता येत नाही. त्यामुळे हा खोटारडेपणा आहे. काहीतरी बातम्या देऊन सरकारचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न आहे.
राहुल गांधी अभ्यास करत नाही
राहुल गांधी यांना काही समजत नाही. ते अभ्यास करत नाहीत. नाही समजलं तर शिकून घ्यावं. त्यांचा एक नेता म्हणतो ते १५००० चं ड्रोन होतं. यांना काय झालं कळत नाही. जे देशाला नाही समजले ते काय परराष्ट्र मंत्रालयावर टीका करतात. राहुल गांधी यांना वर्षाला दोन-दोन महिने विदेशात राहायचं आहे. आणि ते मोदीजी यांना धोरणं शिकवणार? मोदी यांनी दहशतवादी विरोधात लढाईसाठी जगभरातील देशांना एकत्र आणण्याचे प्रयत्न करत आहे. यासाठीच खासदारांना पाठवण्यात आलंय, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.