Navi Mumbai News: संदिप नाईक समर्थकांच्या घरवपसीने भाजपात अंतर्गत संघर्ष पुन्हा पेटणार ?
एका घरात एक तिकीट या नियमाप्रमाणे गणेश नाईक यांना तिकीट देण्यात आले. तर संदिप नाईक यांना तिकीट नाकारण्यात आले. महत्वकांक्षी असलेल्या संदिप नाईक यांनी थेट राष्ट्रवादी शरद पवार गटाची वाट धरली आहे.
नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बेलापुर मतदार संघातील गणेश नाईक समर्थकांनी संदीप नाईक यांच्यासाठी थेट राष्ट्रवादीची कास धरली होती. संदीप नाईक यांना भाजपाने तिकीट नाकारल्याने संदीप नाईक यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विनंती फेटाळत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. संदीप नाईकांसाठी गणेश नाईक समर्थकांनी अनेकांनी खुशीने तर अनेकांनी नाईलाजास्तव संदीप नाईक यांच्यासोबत राष्ट्रवादीत प्रवेश करावा लागला होता. या प्रवेशाने भाजपाच्या जुन्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता.
मात्र अखेर आगामी पालिक निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा नाईक समर्थक प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण व वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत स्वगृही परतले आहेत. मात्र यामुळे नवी मुंबईत पुन्हा एकदा जुने विरुद्ध नवे असा भाजपा अंतर्गत संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे माजी आ. संदीप नाईक देखील भाजपा प्रवेश करण्याची शक्यता आहे.
वनमंत्री गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी निवडणूक लढविण्यासाठी थेट राष्ट्रवादी शरद पवार गटाची वाट धरत निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादीत प्रवेश करण्याआधी त्यांनी भाजपकडून तिकीट मिळविण्यासाठी महाराष्ट्र ते दिल्ली अशी फील्डिंग लावली होती. मात्र एका घरात एक तिकीट या नियमाप्रमाणे गणेश नाईक यांना तिकीट देण्यात आले. तर संदिप नाईक यांना तिकीट नाकारण्यात आले.
महत्वकांक्षी असलेल्या संदिप नाईक यांनी थेट राष्ट्रवादी शरद पवार गटाची वाट धरली.काहीही करून मंदा म्हात्रे यांना हरवण्याचा चंग संदिप नाईक यांनी बांधला होता. या संदिप नाईक, मंदा म्हात्रे यांच्या तुल्यबळ लढतीत निवडणुकी दरम्यान मतदारांवर पैशाचा पाऊस पाडण्यात आला.संदीप नाईक यांच्यासोबत गणेश नाईक समर्थक सर्वच माजी नगरसेवकांनी थेट राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करत, भाजपाला धक्का दिला होता. तर याच समर्थकांनी उघड उघड मंदा म्हात्रे यांच्या विरोधात प्रचार केला.
अखेर मंदा म्हात्रे यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना मैदानात उतरावे लागले होते. मुख्य म्हणजे या निवडणुकीत संदीप नाईक अथवा त्यांच्या समर्थक असलेल्या कोणत्याही माजी नगरसेवकाने अथवा पदाधिकाऱ्यांनी भाजपावर कोणतीही टीका टिप्पणी न करता फक्त मंदा म्हात्रे यांना टार्गेट केलेले दिसून आले. त्यामुळे हा नाईक समर्थकांनी पुनर्पप्रवेशाचा मार्ग मोकळा होण्यासाठी ‘सेफ गेम ‘ खेळले गेल्याचे नुकत्याच झालेल्या घर वापसीमुळे दिसून येत आहे. मात्र आता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते बेलापुर मतदार संघातील सर्व माजी नगरसेवक तसेच नाईक समर्थकांनी घर वापसी केल्याने भाजपा जून विरुद्ध नवे असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. तर निष्ठेने पक्षात काम करणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना भाजपात न्याय मिळणार का ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.
मतदारांना गृहीत धरले का ?
गणेश नाईक समर्थकांनी संदीप नाईक यांच्यासाठी भाजपाला रामराम ठोकून राष्ट्रवादीच्या प्रचार केला होता. संदीप नाईक हमखास निवडून येतील या आशेवर या सर्व माजी नगरसेवकांनी तसेच इच्छुक पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटाचे निवडणूक चिन्ह असलेले ‘तुतारी वाजवणारा माणूस ‘ हा चिन्ह घरोघरी पोहोचविले होते. आगामी पालिका निवडणूक देखील आपल्याला याच चिन्हावर लढवायची असे मानून चिन्ह घरोघरी पोहोचवून सर्वतोपरी प्रयत्न केले गेले होते.
मात्र संदिप नाईक पडल्याने, सर्वच नगरसेवक चिंतेत होते. त्यात आता पुन्हाणे सर्व समर्थक भाजपात आल्याने या माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी मतदारांना गृहीत धरले आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे भाजपात प्रवेश करते झालेले नाईक समर्थकांना मतदार आपल्याला कसे स्वीकारणार ?याची चिंता लागून राहिली आहे. त्यात संदिप नाईक यांच्या खांद्याला खांदा लावून लढलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट तसेच ठाकरे गटातील नेत्यांची पदाधिकाऱ्यांमध्ये आपली फसगत झाल्याची भावना तयार झाली आहे.
भाजपाने स्वतःचे तत्व मोडले ?
भाजपाने ए प्लस, ए, बी सी अशी कॅटेगरी तयार केली होती. त्यानुसार ए प्लस म्हणजे आमदार ए म्हणजे नगरसेवक तर बी म्हणजे मुख्य पदाधिकारी व सी म्हणजे कार्यकर्ते अशी विभागणी केली आहे. त्यानुसार ए प्लस व ए कॅटेगरीत बसणाऱ्या व संकटकाळात पक्ष सोडून जाणाऱ्यांना पक्षात पुन्हा स्थान नाही असे भाजपाने ठरवले होते. तशी माहिती खुद्द भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी वाशीतील पत्रकार परिषदेत दिली होती. तसेच संदिप नाईक यांच्यावर कायमस्वरूपी तसेच त्यांच्यासोबत गेलेल्या माजी नगरसेवकांचे सहा वर्षांसाठी निलंबन केले होते.
मात्र ज्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना भूलथापा देऊन दुसऱ्या पक्षात नेले आहे अशांना मात्र पुन्हा प्रवेश दिला जाईल असे देखील भाजपाने ठरवले होते. मात्र आता सर्वच माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केल्याने तत्वावर चालणाऱ्या भाजपाने स्वतःच्या तत्वाला बगल दिली की, सर्वच माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांना भूल थापा देऊन राष्ट्रवादीत नेले होते या आशयाखाली भाजपाने प्रवेश दिला ? अशी टीका होऊ लागली आहे.
Web Title: With the return home of sandeep naik supporters will the internal conflict in bjp rekindle