ठाणे : भाऊ बहिणींच्या नात्याचं, त्यांच्यातील प्रेमाचं प्रतीक म्हणजे श्रावण महिन्यात येणारा रक्षाबंधनाचा सण. त्यामुळे वर्षभर भावंडं या सणाची आतुरतेने वाट पाहात असतात. यंदा राखी पौर्णिमेचा हा सण ११ ऑगस्ट रोजी सर्वत्र उत्साहात साजरा होणार असून त्यासाठी विविध ट्रेंड्सच्या रंगीबेरंगी राख्या सध्या बाजारात विक्रीसाठी दाखल झालेल्या आहेत.
त्यातील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा फोटो असणारी राखी सध्या ठाण्यातील बाजारपेठेत सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
मागील १२ वर्षांपासून विविध प्रकारच्या हँडमेड राख्या तयार करणाऱ्या कल्पना गंगार यांनी यंदा प्रथमच मुख्यमंत्री शिंदे यांच्या फोटोची राखी (Rakhi) तयार केली आहे. या राखीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो असून त्यावर “आपले मुख्यमंत्री” (Our CM)असा मजकूर लिहिलेला आहे. त्यामुळे सध्याची राजकीय परिस्थिती पाहता रेशमी धाग्यात बांधलेली शिंदे यांची फोटो राखी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
रक्षाबंधनाच्या सणानिमित्त ठाण्यातील अनेक महिला ह्या एकनाथ शिंदे यांना राखी बांधण्यासाठी त्यांच्या निवास्थानी अथवा कार्यालयात भेट देत असतात. तेव्हा अशा महिलांसाठी ही राखी तयार केल्याचे कल्पना गंगार यांनी सांगितले. ही राखी ठाण्यातील कल्पना यांच्या राखी प्रदर्शनात १० रुपयांपासून विक्रीसाठी उपलब्ध आहे.
एकनाथ शिंदे यांच्या रूपाने ठाण्याला प्रथमच मुख्यमंत्री पद लाभले आहे. ही बाब ठाणेकरांसाठी गौरवाची असून यानिमित्ताने रक्षाबंधनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फोटो राखी तयार केली आहे असे, कल्पना गंगार (राखी विक्रेत्या) यांनी सांगितले.