फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम
हिंदू धर्मात लग्नकार्याबाबत विविध परंपरा आहेत. त्यातलीच एक लोकप्रिय प्रथा म्हणजे केळवण. सध्या सोशलमीडिया आणि दैनंदिन मालिकांमधून केळवणाबाबतचे रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. याच केळवणाबाबतचा रंजक इतिहास तुम्हाला माहितेय का ?
ज्या मुला मुलींचं नुकतंच लग्न ठरलेलं असतं त्यांना जेवणाचं आमंत्रण दिलं जातं. केळीच्या पानावर पंचपक्वान्न, पानाभोवती रांगोळी काढली जाते. या सगळ्याचं सर्वसाधारण माहितीनुसार केळवण म्हटलं जातं. मात्र फक्त जेवणाचं आमंत्रण देणं म्हणजे केळवण नव्हे. खरंतर केळवणाला अनेक वर्षांचा इतिहास आहे. केळणाची प्रथेचं मूळ संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात सापडतं. पुर्वीच्या काळी फक्त मुलीचं केळवण केलं जायचं असं म्हटलं जातं. याचं कारण म्हणजे मुलगी एकदा का सासरी गेली की तिचा माहेरच्या नातेवाईकांशी संबंध फार कमी व्हायचा. त्यात भरीला भर म्हणजे आतासारखं पुर्वी दळणवळणाची साधनं नव्हती. म्हणूनच सासरी गेलेली लेक सतत माहेरी येण्यासारखी परिस्थिती तेव्हा नव्हती. याचं लेकीचं कोडकौतुक करण्यासाठी माहेरचे नातेवाईक तिचं केळवण करायचे.
या केळवणाच्या निमित्ताने सासरी जाणाऱ्या मुलीला माहेरची भेट म्हणून साडी देऊन तिचा सन्मान केला जायचा. केळीच्या पानाभोवती रांगोळी काढली जायची. मुलीला हळद कुंकू लावून तिच्या आवडीचा स्वयंपाक केला जायचा. या केळवणाच्या प्रथेबाबत ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे.
ना तरी केळवली नोवरी |
कां सन्यासी जियापरी |
तैसा न मरतां जो करी |
मृत्यूसूचना ||
ज्ञानेश्वर माहाराजांच्या या ओवीचा अर्थ असा की, जशी केळवणानंतर वधू आपलं जुने आयुष्य मागे टाकून सासरी नवं जीवन स्वीकारते, तशीच संन्यासी व्यक्तीही संसाराचा त्याग करून आत्मज्ञानाच्या मार्गावर प्रवास सुरू करतो. याच अर्थाने, जो व्यक्ती जीवनात असतानाच मोह, अहंकार, देहबुद्धी यांचा त्याग करतो, तो जणू मृत्यूच्या आधीच आत्ममुक्त होतो. केळवण फक्त जेवणाचं आमंत्रण नाही, तर नव्या आयुष्याला आनंदाने स्विकारण्याचा एक भावनिक सोहळा आहे असा मतितार्थ ज्ञानेश्वर महाराजांच्या या ओवीचा आहे.
मराठी कुटुंबात केळवणाची प्रथा अगदी आनंदाने साजरी केली जाते. लग्नानंतर वधू किंवा वराचं वैवाहिक आयुष्य सुरु होणार असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्याची ही एक प्रथा आहे. केळवणाच्या निमित्ताने परिवार, नातेवाईक, आणि शेजारी सगळे एकत्र येतात. त्यामुळे सामाजिक जिव्हाळा आणि आपुलकी वाढते. हा या प्रथेचा खरा उद्देश आहे.