Muncipal Corporation Election 2025: शिवसेना शिंदे गटात युतीवर नाराजीचा सूर; श्रीकांत शिंदेंच्या बैठकीत नेमकं काय झालं?
Muncipal Corporation Election 2025: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि भाजपमधील तणाव वाढत असल्याच चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी नुकतीच पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत पक्षात युतीबाबत नाराजीचा सूर पाहायला मिळाला. नाशिक, नागपूर, अमरावती आणि औरंगाबाद विभागातील शिवसेना पदाधिकारी यांनी स्वतंत्र लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
आमदार आणि जिल्हाप्रमुखांनी युती धर्म मित्र पक्षाकडून पाळली जात नसल्याचा आरोप करत निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवारांना प्रवेश देऊन पक्षाची नुकसानकारक भूमिका सुरू असल्याची माहिती नेत्यांसमोर मांडली. याशिवाय, नंदूरबारमधील आमदाराने माजी जिल्हाप्रमुख भाजपसाठी काम करत असल्याचे सांगत पक्षातील नेत्यांचे लक्ष झारीतील ‘शुक्राचार्यांकडे’ वेधले.
ठाणे क्षेत्रात शिवसेना-भाजप युतीत संभ्रम
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगर, वसई-विरार आणि भिवंडी या नगरपालिकांमध्ये शिवसेना आणि भाजप युतीबाबत अजूनही संभ्रम आहे. दोन्ही पक्षांकडून स्वतंत्र मोर्च्यांची बांधणी सुरू असल्याचे वृत्त आहे. ठाण्यातील संजय केळकर, नवी मुंबईतून गणेश नाईक आणि इतर भाजप नेत्यांकडून उघडपणे स्वतंत्र निवडणूक लढवण्याबाबत होणाऱ्या वक्तव्यांमुळे शिवसेना नेत्यांकडून खबरदारी घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, स्वबळाची तयारी सुरू करण्यात आली आहे.
मुंबई वगळता इतर जिल्ह्यांमध्ये युतीत मतभेद
मुंबई वगळता इतर जिल्ह्यांमध्ये शिवसेना-भाजप-महायुती युतीबाबत अजूनही मतभेद जाणवून येत आहेत. या मतभेदाचा फटका विरोधकांना काही ठिकाणी लागू शकतो, असे राजकीय सुत्रांकडून सांगितले जात आहे. सध्या तीनही पक्षांतील समन्वय बैठकांमधून तोडगा निघण्याची शक्यता कमी असून, फक्त वरिष्ठ नेत्यांच्या थेट हस्तक्षेपामुळेच हा तिढा सुटू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. लवकरच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र विभागांच्या बैठका होणार असून, तरीही या विभागातील जिल्ह्यांमध्ये परिस्थिती फारशी वेगळी नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मुंबई वगळता इतर जिल्ह्यांमध्ये युतीबाबत मतभेद कायम असून, त्यावर तोडगा काढण्यासाठी तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची सक्रिय भूमिका आवश्यक आहे.
जळगावमध्ये महायुतीत मिठाचा खडा
जळगावच्या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघांमध्ये महायुतीत मतभेद स्पष्ट दिसत आहेत. शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वबळावर लढण्याचा नारा दिल्यानंतर भाजपनेही आता स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पाचोरा आणि भडगाव मतदारसंघांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना आणि भाजप स्वबळावर थेट संघर्षाच्या रूपात लढवणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तसेच, हिंगोलीतही शिंदे गटाच्या शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा नारा दिला असून, याबाबत आमदार संतोष बांगर यांनी माहिती दिली आहे.