फोटो सौजन्य- pinterest
दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीची सुरुवात मोठ्या उत्साहात झालेली आहे. दिवाळीचा हा सण म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा आणि सकारात्मकतेचा सण. या सणाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने होतो तो दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. या दिवशी पहाटे उठून उटणे लावून अभ्यंग स्नान करणे आणि कारीट फोडणे म्हणजेच कडवट फळ पायाने फोडणे ही परंपरा आहे. ही परंपरा आजही महाराष्ट्रामध्ये अनेक घरामध्ये पाळली जाते. यामागे धार्मिक आणि अध्यात्मिक असे अनेक कारणे आहेत. यंदा नरक चतुर्दशी हा सण सोमवार, 20 ऑक्टोबर रोजी सर्वत्र उत्साहात साजरा केला जाणार आहे. यावेळी बऱ्याच ठिकाणी दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन देखील केले जाते.
पंचांगानुसार नरक चतुर्दशी कार्तिक महिन्यामध्ये चतुर्दशी तिथीला येते. यंदा चतुर्दशी तिथीची सुरुवात 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 1.52 मिनिटांनी सुरु होणार आहे आणि 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.44 मिनिटांनी संपेल.
कथांमध्ये उल्लेख केल्यानुसार, नरक चतुर्दशीच्या दिवशी श्रीकृष्णाने नरकासूर या क्रूर आणि अत्याचारी राक्षसाचा वध केला होता. नरकासुराने हजारो स्त्रियांना बंदिवासात ठेवले होते आणि संपूर्ण सृष्टीवर त्याचे अत्याचार सुरु होते. देवानी श्रीकृष्णांकडे मदतीची याचना केली आणि अखेर श्रीकृष्णाने नरकासुराचा नाश करुन सृष्टीला मुक्त केले.
नरकासुराच्या मृत्यूपूर्वी त्याने शेवटची एक विनंती श्रीकृष्णाकडे केली या दिवशी जे लोक मंगलस्नान करतील त्यांना नरकयातना भोगावी लागू नये. श्रीकृष्णाने ही मागणी पूर्ण केली आणि त्यावेळेपासून अश्विन वद्य चतुर्दशी म्हणजे नरक चतुर्दशी म्हणून साजरी केली जाऊ लागली.
नरकासुराचा वध करुन परतल्यानंतर श्रीकृष्णाच्या शरीराला त्याच्या रक्ताचे आणि घामाचे डाग लागले होते, हे डाग धुवून शरीर स्वच्छ करण्यासाठी श्रीकृष्णाला सुंगधी तेल, उठणे लावून त्यांना स्नान घालणे त्यामुळे अभ्यंगस्नाची परंपरा सुरु झाली. हे स्थान सूर्योद्यापूर्वीच करायला पाहिजे. असे म्हटले जाते की, नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान केल्याने मनुष्याचे वर्षभरातील सर्व पापे धुतले जातात. या दिवशी स्नान केल्यानंतर नरक यातनांपासून मुक्ती मिळते, असे मानले जाते. अभ्यंग स्नानानंतर यमतर्पण केल्याने अकाली मृत्यूचे भय टळते.
अभ्यंग स्नानापूर्वी कारीट नावाचे एक फळ आहे ते पायाने फोडण्याची प्रथा आहे. ही प्रथा नरक चतुर्दशीचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. कारण कारीटला नरकासुराचे प्रतीक मानले जाते. श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला याचे प्रतीक म्हणून नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे कारीटवर पाय ठेवून ते फोडले जाते. ते फोडल्यानंतर त्यातून बाहेर पडणारा लालसर किंवा पिवळसर रस हा नरकासुराच्या रक्ताचे प्रतीक मानले जाते. हे कृत्य वाईटावर आणि पापांवर विजय मिळवल्याचा शुभ संकेत देते. कारीट फोडल्यानंतर येणारा वास नरकासुरानंतर दूर झालेल्या अत्याचार आणि वाईट शक्तींचे प्रतीक मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)