फोटो सौजन्य- pinterest
वसुबारस हा दिवाळी सणाची सुरुवात मानला जातो. हा सण भारतीय संस्कृतीमधील खूप महत्त्वाचा आणि मंगलमय सण मानला जातो. वसुबारस या शब्दाचा अर्थ असा होतो की, वसु म्हणजे द्रव्य आणि बारस म्हणजे द्वादशी. त्यामुळेच या सणाला गोवत्स द्वादशी असे देखील म्हटले जाते. पंचांगानुसार हा सण कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या बाराव्या दिवशी साजरा केला जातो. भारत हा कृषिप्रधान देश असल्याने हिंदू धर्मामध्ये गायला गोमाता मानले जाते. त्यामुळे या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी महिला गाय आणि वासराची पूजा करतात. हा सण जीवनात समृद्धी, शांती आणि धर्माचे रक्षण करण्याचे प्रतीक आहे. वसुबारसच्या दिवशी गायची पूजा का केली जाते, काय आहे यामागील इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या
वसुबारस तिथीची सुरुवात शुक्रवार, 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजून 12 मिनिटांनी होणार आहे आणि याची समाप्ती शनिवार 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजून 18 मिनिटांनी होणार आहे. वसुबारसच्या दिवशी पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त प्रदोशकाळामध्ये 4 वाजून 14 मिनिट ते 7 वाजून 43 मिनिटांपर्यंत असेल.
वसुबारसच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. त्यानंतर चांगले कपडे परिधान करुन घराबाहेर रांगोळी काढावी. जर तुमच्या घरी गाय किंवा वासरु असेल तर त्याची पूजा करावी. गाय किंवा वासरु नसेल तर गाय किंवा तिच्या वासराची मूर्ती किंवा फोटो घरी आणून पूजा करावी. गाईला ओवाळून तिला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा.
पौराणिक मान्यतेनुसार, समुद्रमंथनातून ज्यावेळी 14 रत्न बाहेर आली त्यातून कामधेनुची देखील उत्पत्ती झाली. त्यामुळेच हिंदू धर्मामध्ये गाईला महत्त्वाचे स्थान आहे. गाईची सेवा केल्याने कुटुंबामध्ये सुख समृद्धी नांदते, असे म्हटले जाते.
दिवाळीची सुरुवात वसुबारस या सणाने होते. ऋग्वेद, अथर्ववेद आणि स्कंद पुराणात गायीच्या महत्त्वाचा विशेष उल्लेख करण्यात आलेला आहे. ‘गोः सर्वस्य जननी’ – गायीला संपूर्ण सृष्टीची आई म्हटले आहे. वसुबारसच्या दिवशी गाय आणि वासराची पूजा केल्याने घरात समृद्धी, शक्ती आणि तेजाचे प्रतीक “वसु” येते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. महिला या दिवशी उपवास करतात आणि गायीला हिरवे गवत, गूळ आणि चणे अर्पण करतात. वसुबारस हा सण प्रामुख्याने गायबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि समृद्धीसाठी साजरा करण्यात येतो.
वसुबारस सणामागे धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. धर्मशास्त्रांनुसार गाईला 33 कोटी देवता मानले जाते. त्यामुळे तिचे पूजन केल्याने सर्व देवतांचे पूजन केले असे मानले जाते. या दिवशी गाईची पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि पुण्याची वृद्धी होते, अशी मान्यता आहे. शेतीप्रधान संस्कृती असलेल्या भारतामध्ये गाईला केवळ पवित्र जानवर म्हणून नाही, तर कुटुंबाचा एक भाग मानले जाते. त्यामुळे वसुबारसचा सण धार्मिक नसून सांस्कतिक आणि सामाजिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)