हिंदू धर्मात नमस्कार करणं हे सुसंस्कृत असल्याचं लक्षण मानलं जातं. मग हा नमस्कार देवाला केलेला असो किंवा वडीलधाऱ्या व्यक्तींना. नमस्काराचे अनेक प्रकार आहेत, त्यातला एक प्रकार म्हणजे साष्टांग नमस्कार. असं म्हटलं जातं की हिंदू धर्मात साष्टांग नमस्कार महिलांना करु नये, यामागे नक्की काय कारण आहे ते जाणून घेऊयात.
बहुतांश वेळा कुलदैवाताला गेल्यावर किंवा इष्ट देवतेचा साष्टांग नमस्कार घालण्याची प्रथा आहे. बहुतेक तर हा साष्टांग नमस्कार पुरुषांनी घालण्याची प्रथा परंपरा आहे. मात्र हिंदु धर्मात महिलांना साष्टांग नमस्कार घालण्याची परवानगी नाही. याला देखील काही कारणं आहेत. हिंदू धर्मानुसार नमस्कारात तीन प्रकार असतात. ते तीन प्रकार म्हणजे कायिक, वाचिक आणि आंगिक. कायिक म्हणजे संपूर्ण काया म्हणजेच शरीर संपूर्णपणे जमिनीला स्पर्श होतो तो नमस्कार म्हणजे कायिक नमस्कार त्यालाच साष्टांग नमस्कार असं देखील म्हणतात. या नमस्काराला महत्व जास्त आहे. याचं कारण म्हणजे हृदय, माथा, पाय,हात,गुडघे अशी शरीराची अवयवं जमिनीला टेकतात. त्यामुळे याला सर्वात जास्त महत्व दिलं जातं. मात्र असं जरी असलं तरी स्त्रियांनी साष्टांग नमस्कार करु नये असं शास्त्रात सांगितलं आहे.
स्त्रियांनी साष्टांग नमस्कार यासाठी करु नये की, महिलांचं गर्भाशय आणि वक्ष हे त्यामागचं मुख्य कारण आहे. जमीन देखील स्त्रीत्वाचं प्रतीक आहे. जमिन आणि स्त्री जन्म देण्याचं कार्य करतात. एखाद्या जीवाला जन्म देणं आणि त्याचा सांभाळ करणं ही दोन्ही कार्य महिला आणि जमीन सारखंच करतात. स्त्रियांच्या गर्भाशयातून नवा जीव जन्माला येतो तर वक्षांमुळे ती नव्या जीवाचं संगोपन करते. याच कारणाने स्त्रीने साष्टांग नमस्कार करताना या अंगांना जमिनीला स्पर्श करु नये असं सांगितलं जातं. म्हणूनच स्त्रियांनी गुडघ्यावर बसून जमिनीवर डोकं टेकवावं असं शास्त्रात सांगितलं जातं. हेच खरं कारण आहे की,स्त्रियांनी साष्टांग नमस्कार करु नये.