
Lal Bahadur Shastri Death Anniversary, Jai Jawan Jai Kisan, Tashkent Agreement, Shastri death mystery
११ जानेवारी १९६६ रोजी उझबेकिस्तानमधील ताश्कंद येथे शास्त्री यांचे अचानक निधन झाले. पाकिस्तानसोबत झालेल्या ऐतिहासिक बैठकीनंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे अधिकृत कारण सांगण्यात आले. मात्र, या घटनेने देशभरात अनेक प्रश्न निर्माण केले. त्यांच्या मृत्यूमागे कट असल्याचे आरोप वेळोवेळी करण्यात आले, मात्र याबाबतचे सत्य आजतागायत उघडकीस आलेले नाही.
Srinagar News: आई ती आईच….! शहीद लेकाच्या पुतळ्याला थंडीत मायेची घोंगडी
१९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर दोन्ही देशांमधील तणाव कमालीचा वाढला होता. युद्धानंतरची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सोव्हिएत युनियनने मध्यस्थी करत ताश्कंद करार घडवून आणला. १० जानेवारी १९६६ रोजी भारतीय पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री आणि पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे शास्त्री यांच्यावर देशांतर्गत राजकीय दबाव मोठ्या प्रमाणात होता. तरीही त्यांनी राष्ट्रीय हिताला सर्वोच्च प्राधान्य देत निर्णय घेतला. मात्र, करारानंतर अवघ्या काही तासांतच त्यांचे निधन झाले आणि ताश्कंदमधील तो प्रसंग भारतीय राजकारणातील एक न सुटलेले कोडे ठरला आहे.
वृत्तांनुसार, १० जानेवारी १९६६ रोजी रात्री ताश्कंद करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी हलके जेवण घेतले आणि एक ग्लास दूध पिऊन विश्रांतीस गेले. मात्र, ११ जानेवारी रोजी पहाटे सुमारे १.२५ वाजता त्यांना अचानक अस्वस्थता जाणवू लागली आणि तीव्र खोकल्याची तक्रार झाली. तत्काळ डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. मात्र, सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि पहाटे १.३२ वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. अधिकृत वैद्यकीय अहवालानुसार, शास्त्री यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
शास्त्री यांच्या अचानक मृत्यूमुळे देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यांच्या लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यूचा कट रचला गेल्याचा संशय व्यक्त केला जाऊ लागला. शास्त्री यांच्या पत्नी ललिता देवी यांनी सर्वप्रथम विषबाधेचा संशय व्यक्त केला होता. शास्त्री यांचे पार्थिव भारतात आणल्यानंतर अनेकांनी त्यांच्या शरीरावर निळसर डाग असल्याचे निदर्शनास आणले, ज्यामुळे संशय अधिकच बळावला. त्यासोबतच शवविच्छेदन करण्यात आले नसल्याचेही समोर आले. ताश्कंदमधील ज्या खोलीत शास्त्री मुक्कामाला होते, त्या खोलीत फोन किंवा आपत्कालीन घंटा नसल्याचे सांगितले जाते. तसेच, त्यांना वेळेवर आणि पुरेसे वैद्यकीय उपचार मिळाले का, यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
शास्त्री यांच्या मृत्यूच्या चौकशीबाबत वेळोवेळी विविध दावे करण्यात आले. मात्र, कोणतीही अधिकृत आणि ठोस निष्कर्ष देणारी चौकशी आजपर्यंत समोर आलेली नाही. राज नारायण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पहिल्या चौकशीतूनही निष्कर्ष निघू शकले नाहीत. २००९ मध्ये केंद्र सरकारने संसदेत सांगितले की सोव्हिएत आणि भारतीय डॉक्टरांनी या प्रकरणाची चौकशी केली होती. मात्र, त्या चौकशीचे कोणतेही लेखी रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) या संदर्भातील एक फाइल अस्तित्वात असल्याचे सांगितले जाते, मात्र ती अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही. शास्त्री यांचे वैयक्तिक डॉक्टर डॉ. आर. एन. चुघ यांचेही नंतर एका संशयास्पद रस्ते अपघातात निधन झाले. या घटनेमुळे शास्त्री यांच्या मृत्यूभोवतीचे गूढ आणखी गडद झाले असून, हा विषय आजही अनुत्तरित प्रश्न म्हणून कायम आहे.