आई ती आईच....! शहीद लेकाच्या पुतळ्याला थंडीत मायेची घोंगडी
मुलाच्या हौतात्म्याचा उल्लेख करताना आईचे डोळे वारंवार पाणावत होते. त्या म्हणाल्या की, मुलाला गमावल्याचे दुःख कधीच कमी होणार नाही, पण त्याने देशासाठी प्राण दिले याचा सार्थ अभिमान आहे. आजही त्याचा आवाज कानात घुमतो.
२२ ऑक्टोबर २०१६ रोजी साबा सेक्टरमधील बोबिया या सुरक्षा चौकीवर दहशतवाद्यांशी दोन हात करताना बीएसएफचे २४ वर्षीय शिपाई गुरनामसिंग मातृभूमीचे रक्षण करताना शहीद झाले. गुरनाम यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी या चौकात त्यांचा पुतळा उभारण्यात आला, प्रत्येक आई आपल्या मुलाची करते, तेवढीच गुरनाम यांची आई जसवंत कौर आजही त्यांची काळजी घेतात. शुक्रवारी पुतळ्यापाशी उभ्या असलेल्या जसवंत कौर यानी जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या की, गुरनामला लहानपणापासूनच खूप थंडी वाजत असे आणि त्याला घोंगडी पांघरण्याची खूप आवड होती. तो ऑक्टोबरमध्येच ब्लॅंकेट बाहेर काढायला लावायचा. ड्युटीवर असतानाही तो घरून गरम कपडे आणि घोंगडी मागवून घेत असे.
जसवंत कौर यांनी सांगितले की, शहीद होण्यापूर्वी गुरनामने घरी फोन करून सांगितले होते की, त्याने दहशतवाद्यांना ठार केले. स्वतःची काळजी घेण्यास सांगितले असता तो म्हणायचा, तुझा वाघ घाबरणार नाही. तो अनेकदा म्हणायचा की, ‘मी शहीद झालो तर गावाच्या चौकात माझा पुतळा उभारा, जो संपूर्ण जग बघेल.’
वडील कुलबीरसिंग शांत उभे राहून पुतळ्याकडे बघत होते. त्यांच्या शांततेत पित्याचा अभिमान आणि तुटलेल्या हृदयाचे दुःख दोन्ही स्पष्ट दिसत होते. आई जसवंत कौर म्हणाल्या की, ज्या चौकात पुतळा आहे तो खूप छोटा आहे. अनेकदा तिथून गाड्या जाताना स्मारकाला धक्का लागतो, तेव्हा माझे काळीज फाटते. हा चौक मोठा केला पाहिजे. वडील कुलबीर यांनी आपले दुःख मोकळे करताना सांगितले की, गुरनाम शहीद झाला तेव्हा आम्हाला अनेक आश्वासने देण्यात आली. माझ्या मुलीला बीएसएफने नोकरी दिली, आता तिचे लग्न झाले आहे. पण जम्मू-कश्मीर सरकारने काहीच दिले नाही. पाच लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, जे आजही अपूर्ण आहे. आमच्याकडे शेतीवाडी नाही आणि खाण्यासाठीही काही नाही.






