हायपरटेन्शन डे (फोटो- istockphoto)
पुणे: जागतिक स्तरावर मृत्यूचे प्रमुख कारण असलेल्या उच्च रक्तदाबाबद्दल जागरूकता वाढवणे गरजेचे आहे. त्यामुळेच दरवर्षी 17 मे हा दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त सध्या चिंतेचा विषय ठरत असलेल्या लहान मुलांमधील उच्च रक्तदाबाच्या वाढत्या प्रकरणांकडे लक्ष वेधले जात आहे. एकेकाळी केवळ प्रौढांमध्ये आढळणारी ही समस्या आता लहानग्यांनाही आपल्या विळख्यात घेत आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि आहारातील गडबडीमुळे हायपरटेन्शन आता मुलांमध्येही वाढताना दिसत आहे.
वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ. अभिमन्यू सेनगुप्ता यांनी सांगितले की, उच्च रक्तदाब ही पूर्वी प्रौढांची समस्या मानली जात होती. मात्र आता किशोरवयीन मुलांमध्येही याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. सुरुवातीच्या टप्प्यावर या आजाराची लक्षणे दिसत नाहीत, त्यामुळे निदान उशिरा होते आणि परिणामी हृदय, मेंदू व अन्य अवयवांवर याचा गंभीर परिणाम होतो.
उच्च रक्तदाबाची कारणं अनेक असली तरी बहुतांश वेळा लठ्ठपणा, ताणतणाव, अयोग्य आहार व कमी शारीरिक हालचाल ही प्रमुख कारणं असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. काही वेळा हार्मोनल बदल, मूत्रपिंडाचे आजार किंवा विशिष्ट ट्यूमरही यामागे कारणीभूत असू शकतात.
डॉ. आदित्य देशमुख यांनी सांगितले की, ज्या मुलांचे वजन प्रमाणापेक्षा अधिक आहे, ज्या मुलांना जन्मतःच हृदय वा फुफ्फुसांचे आजार आहेत, अशा मुलांची रक्तदाब तपासणी नियमित करणे गरजेचे आहे. पौगंडावस्थेतील मुलांमध्ये डोकेदुखी, चक्कर येणे, उलटी, नाकातून रक्त येणे यासारखी लक्षणं दिसू शकतात. मात्र निदान होणे कठीण जाते.
उच्च रक्तदाब असल्याचे निदान झाल्यास डॉक्टर उपचार त्यांच्या मूळ कारणानुसार करतात. काही प्रकरणांमध्ये औषधोपचार आवश्यक ठरतो. मात्र बहुतांश वेळा जीवनशैलीत बदल केल्याने रक्तदाब नियंत्रणात ठेवता येतो. यामध्ये संतुलित आणि कमी मीठ असलेला आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि मानसिक ताण टाळणे यांचा समावेश आहे. मुलांनी ताजी फळे, भाज्या, धान्य, डाळी यांचा समावेश असलेला आहार घ्यावा आणि प्रक्रिया केलेले, तेलकट व मसालेदार पदार्थ टाळावेत, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे. तसेच सायकलिंग किंवा मैदानी खेळांसारख्या शारीरिक हालचालींमध्ये मुले सहभागी झाले पाहिजेत.
बालवयातील उच्च रक्तदाबाचे दीर्घकालीन परिणाम गंभीर असू शकतात. त्यामुळे पालकांनी त्यांच्या मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे, त्यांचे वजन नियंत्रित ठेवावे आणि नियमित वैद्यकीय तपासणी करून हायपरटेन्शनची वेळेवर दखल घ्यावी. केवळ आजाराचे निदान आणि उपचारच नव्हे, तर प्रतिबंधात्मक उपाययोजनाही तितक्याच महत्त्वाच्या असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
लहानपणापासूनच निरोगी सवयींचा अंगीकार, घरात मोठ्यांनी घेतलेली जबाबदारी आणि आरोग्याबद्दलची जागरूकता यामुळेच भविष्यातील गंभीर आरोग्य समस्यांना टाळता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.