पर्यावरणाशी एकनिष्ठ ‘नवदुर्गा’
वन्यजीव आणि इतर प्राणी बचाव कार्य मोहीमांमध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून समर्पितपणे कार्य करणाऱ्यांमध्ये ‘नेहा पंचमीया’ यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. प्राण्यांवर डोळस प्रेम करणाऱ्या नेहा यांनी २००७ मध्ये प्राण्यांच्या बचाव कार्यासाठी ‘रेस्क्यू चारिटेबल ट्रस्ट’ या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सक्रिय प्राणी बचाव संस्थेची स्थापना केली. याची सुरुवात एका साध्या फोन कॉलने झाली.
एका नागरिकाने जखमी प्राणी पाहिला आणि त्याला मदतीसाठी कोणाला बोलवायचे हेच कळत नव्हते. त्या क्षणी नेहांना जाणवले की प्राण्यांच्या आपत्कालीन सेवेत मोठी पोकळी आहे. त्यांनी दुर्लक्ष न करता पावले उचलली आणि रेस्क्यूची सुरुवात झाली. काही जखमी प्राण्यांची सुटका करण्यापासून सुरुवात झालेला त्यांचा प्रवास वयाच्या केवळ २३व्या वर्षी एका मोठ्या ध्येयामध्ये रुपांतरित झाला. याची पायाभरणी २००७ मध्ये झाली. पण २०१६ नंतर या संस्थेला एक व्यावसायिक आणि संरचित असे स्वरूप मिळाले. त्या काळात नेहा आणि त्यांच्या टीमने नवीन केंद्र सुरू केले, प्रणाली विकसित केल्या, प्रशिक्षित टीम तयार केली आणि संकटात सापडलेल्या प्राण्यांसाठी सुरक्षित जागा निर्माण केली.