
Benefits of handwritten letters vs digital messaging
अथांग पसरलेल्या आधुनिक डिजिटल युगात जिथे मोबाईलवरील एका ‘क्लिक’वर किंवा ‘इन्स्टंट मेसेज’द्वारे हजारो मैल दूर असलेल्या व्यक्तीशी संवाद साधला जातो, तिथे पत्रलेखनाची कला हळूहळू लोप पावत चालल्याचे दिसते. मात्र, व्हॉट्सॲप, ई-मेल किंवा सोशल मीडियाच्या गर्दीत आजही हस्तलिखित पत्रांचे (Handwritten Letters) मोल अमूल्य आणि अजोड मानले जाते. दरवर्षी १ सप्टेंबर हा दिवस जगभरात ‘जागतिक पत्रलेखन दिन’ (World Letter Writing Day) म्हणून अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस केवळ कागद आणि शाईचा उत्सव नसून मानवी नात्यांमधील ओलावा, आपुलकी आणि भावनांचा खजिना जतन करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
जागतिक पत्रलेखन दिनाची सुरुवात २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध लेखक, कलाकार आणि छायाचित्रकार रिचर्ड सिम्पकिन (Richard Simpkin) यांच्या कल्पनेतून झाली. सिम्पकिन यांनी १९९० च्या दशकात ऑस्ट्रेलियातील अनेक दिग्गजांना आणि आदरणीय व्यक्तींना हाताने पत्रे लिहिण्याचा उपक्रम सुरू केला होता. जेव्हा त्यांना त्या पत्रांना हस्तलिखित उत्तरे मिळाली, तेव्हा पत्रांमधील आत्मीयता आणि आनंद त्यांनी जवळून अनुभवला. या संवादाच्या अद्भुत अनुभवातून प्रेरीत होऊन त्यांनी १ सप्टेंबर हा दिवस जागतिक स्तरावर पत्रलेखनाचा वारसा जपण्यासाठी समर्पित केला. प्राचीन काळातील ग्रीस, इजिप्त, रोम आणि भारतापासून सुरू झालेली ही परंपरा शतकानुशतके मानवी संस्कृतीचा कणा राहिली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nepal Flood : इंजिनिअरला राष्ट्रीय पुरस्कार द्या! नेपाळ महापुराच्या रौद्ररूपातही अचल राहिले ‘ते’ घर; सोशल मीडियावर VIDEO VIRAL
डिजिटल मेसेज क्षणभरात वाचले जातात आणि तितक्याच वेगाने विसरले जातात, परंतु हाताने लिहिलेले पत्र हे कायमस्वरूपी जतन करून ठेवता येणारा स्मृतींचा खजिना असते. पत्रावर असणारे लेखकाचे विशिष्ट हस्ताक्षर, शाईचा वास, कागदाचा स्पर्श आणि ते पत्र लिहिण्यासाठी खर्च केलेला वेळ हे सर्व घटक त्या संदेशाला अत्यंत खास आणि वैयक्तिक बनवतात. पत्र वाचताना समोरच्या व्यक्तीचा आवाज आणि त्याच्या भावना प्रत्यक्षात जाणवतात. पूर्वीच्या काळात टपाल खात्याचा पोस्टमन घरासमोर आला की पत्राची वाट पाहणाऱ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आणि हुरहूर दिसायची, ती डिजिटल संदेशांमध्ये कधीच अनुभवता येत नाही.
शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये या दिवसाचे औचित्य साधून विशेष उपक्रम आयोजित केले जातात. विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना, मित्रांना किंवा शिक्षकांना पत्र लिहिण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. यामुळे मुलांच्या कल्पकतेला, भाषिक क्षमतेला आणि लेखनशैलीला चालना मिळते. विचार शांतपणे कागदावर उतरवल्याने मानवी मन एकाग्र होते आणि विचारांची सुस्पष्टता वाढते. पत्रलेखन हे केवळ संवादाचे माध्यम नसून ते मानसिक शांतता आणि आत्मपरीक्षणाचा एक उत्तम मार्ग मानला जातो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : China: नेपाळ-तिबेट सीमेवर 676 जणांचा बळी; चीनकडून पुराचे VIRAL VIDEO डिलीट, माहितीवर कडक सेन्सॉरशिप
आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाने वेढलेल्या जगात ‘स्लो कम्युनिकेशन’ (Slow Communication) ही संकल्पना पुन्हा लोकप्रिय होत आहे. लोक आता डिजिटल डिटॉक्स (Digital Detox) म्हणून आणि आपल्या जवळच्या व्यक्तींशी दृढ नाते निर्माण करण्यासाठी पुन्हा एकदा पेन आणि कागद हातात घेऊ लागले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘पोस्टक्रॉसिंग’ (Postcrossing) सारख्या उपक्रमांद्वारे जगभरातील लोक एकमेकांना पोस्टकार्ड पाठवून संस्कृतीची देवाणघेवाण करत आहेत.
जागतिक पत्रलेखन दिन आपल्याला हेच शिकवतो की तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले, तरी मानवी स्पर्श आणि भावनांची जागा कोणतीही स्क्रीन घेऊ शकत नाही. आजच्या या विशेष दिवशी तुम्हीही डिजिटल उपकरणांपासून थोडे दूर होऊन तुमच्या जवळच्या व्यक्तीला, जुन्या मित्राला किंवा पालकांना एक सुंदर हस्तलिखित पत्र नक्की लिहा. तुमचे ते काही शब्द त्यांच्या चेहऱ्यावर आयुष्यभराचे हसू आणि मनात आठवणींची उब निर्माण करण्यासाठी पुरेसे ठरतील.