
Shark
World Paper Bag Day Special: कागदी पिशवी खरोखरच पर्यावरणपूरक आहे का?
समुद्राचे नैसर्गिक संतुलन राखणारे शार्क हे समुद्रातील सर्वोच्च भक्षक आहेत. ते कमकुवत, आजारी आणि जखमी जलचरांची संख्या नियंत्रित करून समुद्रातील अन्नसाखळीचा समतोल राखतात. एखाद्या प्रजातीची संख्या अनियंत्रित वाढू नये आणि समुद्री जैवविविधता अबाधित राहावी, यासाठी शार्कची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
शार्कची संख्या कमी झाल्यास त्याचा परिणाम केवळ एका प्रजातीवर होत नाही. माशांच्या संख्येतील असंतुलन, प्रवाळ भित्तींचे नुकसान, समुद्री गवताच्या क्षेत्रांमध्ये घट आणि अखेरीस संपूर्ण महासागराच्या आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम दिसून येतात.
शार्कबद्दलचा सर्वात मोठा गैरसमज म्हणजे ते मानवासाठी मोठा धोका आहेत. प्रत्यक्षात जगभरात शार्कच्या हल्ल्यांमुळे दरवर्षी सरासरी दहापेक्षाही कमी मृत्यू होतात. मात्र, अतिमासेमारी, शार्कच्या परांसाठी होणारी शिकार, मासेमारीच्या जाळ्यात अनावधानाने अडकणे, समुद्री प्रदूषण आणि हवामान बदल यामुळे दरवर्षी दहा कोटींहून अधिक शार्क मारले जातात.
ग्लोबल शार्क ट्रेंडच्या अभ्यासानुसार १९७० ते २०१८ या काळात समुद्री शार्क आणि रे माशांच्या संख्येत ७१ टक्क्यांची घट झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, ही केवळ एका जीवाची घट नसून महासागराच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा आहे.
महाराष्ट्राच्या सुमारे ७२० किलोमीटर लांबीच्या कोकण किनारपट्टीवर व्हेल शार्कसह अनेक शार्क प्रजाती आढळतात. जगातील सर्वांत मोठा मासा असलेल्या व्हेल शार्कच्या संरक्षणासाठी वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत कडक संरक्षण देण्यात आले आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड किनारपट्टीवर जनजागृती, जाळ्यात अडकलेल्या व्हेल शार्कला सुरक्षितपणे समुद्रात सोडण्याचे उपक्रम आणि मच्छीमारांच्या सहभागातून संवर्धनाचे प्रयत्न सुरू आहेत.
शार्कचे संरक्षण म्हणजे केवळ एका प्रजातीचे संरक्षण नव्हे, तर संपूर्ण समुद्री परिसंस्थेचे आणि मानवाच्या भविष्यासाठी आवश्यक असलेल्या महासागरांचे संरक्षण होय. त्यामुळे शार्ककडे भीतीने नव्हे, तर निसर्गाचा समतोल राखणारा महत्त्वाचा जीव म्हणून पाहण्याची गरज आहे.