Champions Trophy 2025 IND vs BAN Match : बांगलादेशने फलंदाजी घेऊन पायावर पाडला धोंडा; 'या' कारणाने होणार रोहितसेनेचा विजय
Champions Trophy 2025 IND vs BAN Match : भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळत आहे. नाणेफेक बांगलादेशच्या बाजूने पडली आणि संघाचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णयच भारतीय संघाच्या पथ्यावर पडल्याचे दिसून आले. कारण बांगलादेशची सुरुवात अत्यंत डळमळीत झाली. फलंदाजीच्या या निर्णयामुळे बांगलादेश संघ सामना गमावू शकतो.
बांगलादेशला प्रथम फलंदाजी पडली महागात
बांगलादेशचा प्रथम फलंदाजीचा निर्णय
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या पहिल्या सामन्यात भारतीय संघ बांगलादेशचा सामना करीत आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होत आहे. जरी या स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानकडे असले तरी BCCI ने तिथे संघ पाठवण्यास नकार दिला. अशा परिस्थितीत भारतीय संघाचे सामने दुबईमध्ये होत आहेत. भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध प्रथम गोलंदाजी करीत आहे. नजमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
दुबईमध्ये धावांचा पाठलाग करणे सोपे
दुबईमध्ये धावांचा पाठलाग करणे नेहमीच सोपे असते. आतापर्यंत येथे ५८ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने ३४ वेळा विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला फक्त २२ सामने जिंकता आले आहेत. दुबईमध्ये संध्याकाळी भरपूर दव पडतो पण गेल्या काही दिवसांत दव पडलेला नाही. हा सामना नवीन खेळपट्टीवर खेळला जात आहे आणि त्यामुळे सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांनाही मदत मिळण्याची अपेक्षा आहे.
अर्शदीप प्लेइंग इलेव्हनचा भाग नाही
भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अर्शदीप सिंगला संधी मिळालेली नाही. इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात तो प्लेइंग इलेव्हनचा भाग होता. त्याने पॉवरप्लेमध्ये दोन विकेट्सही घेतल्या. त्याच्या जागी मोहम्मद शमी परतला आहे. हर्षित राणा हा संघाचा दुसरा वेगवान गोलंदाज आहे. तर कुलदीप यादव हा मुख्य फिरकी गोलंदाज आहे. त्याला रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल साथ देतील. भारतीय संघाकडे हार्दिक पंड्याच्या रूपात सहावा गोलंदाजीचा पर्याय देखील आहे. फलंदाजीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल सलामीला येतील. यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यरची पाळी येते. केएल राहुल यष्टीरक्षक म्हणून प्लेइंग इलेव्हनचा भाग आहे.