अखेर पाकिस्तान नरमले; चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड मॉडेलद्वारेच होणार; महत्त्वाची अपडेट आली समोर
India vs Pakistan CT 2025 Hybrid Model : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हायब्रीड मॉडेलसाठी तयार आहे. पण, त्याची अधिकृत घोषणा अजून व्हायची आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत पीसीबी यूएईशी बोलणार आहे. टीम इंडियाचे सामने तटस्थ ठिकाणी होणार आहेत. त्यामुळे भारत युएईमध्ये आपले सामने खेळू शकतो. चॅम्पियन्स ट्रॉफीबाबतचा अंतिम निर्णय शनिवारी रात्री किंवा रविवारी सकाळी अधिकृतपणे जाहीर केला जाऊ शकतो.
पाकिस्तान बोर्डाचे अधिकारी सहभागी
चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत ICC ने शुक्रवारी बैठक घेतली होती. त्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि पाकिस्तान बोर्डाचे अधिकारी सहभागी झाले होते. मात्र, या बैठकीत कोणताही निर्णय न झाल्याने तो पुढे नेण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान आता हायब्रीड मॉडेलसाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे टीम इंडिया आपले सामने यूएईमध्ये खेळू शकते. पण त्याची अधिकृत घोषणा अजून व्हायची आहे.
पीसीबी आणि यूएई बोर्ड यांच्यात सुरू असलेली चर्चा
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ठिकाणाबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि यूएई बोर्ड यांच्यात चर्चा सुरू आहे. जर सर्व काही ठीक झाले तर टीम इंडिया दुबईत आपले सामने खेळू शकते. ICC शनिवारी रात्री किंवा रविवारी सकाळी याबाबत माहिती देऊ शकते. पीसीबी यापूर्वी हायब्रीड मॉडेलसाठी तयार नव्हते. या स्पर्धेसाठी टीम इंडियाने पाकिस्तानात यावे अशी तिची इच्छा होती. मात्र भारताने सुरक्षेचे कारण सांगून स्पष्ट नकार दिला.
पाकिस्तानने सहमती दिली नसती तर पर्याय काय असता
जर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हायब्रीड मॉडेलला सहमती दिली नसती तर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले असते. त्याशिवाय भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणे शक्यच नव्हते. टीम इंडियाच्या अनुपस्थितीमुळे आयसीसीचे मोठे आर्थिक नुकसान झाले असते. दुसरा पर्याय असा होता की होस्टिंगचे हक्क पाकिस्तान ऐवजी अन्य कोणत्या तरी देशाला दिले गेले असते. अशा स्थितीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नुकसान झाले असते.