
Chess Tournament : बुद्धिबळाच्या पटावर 17 खेळाडूंचा चौकार; चार फेऱ्यांनंतर संयुक्त आघाडी
Chess Tournament : बुद्धिबळाच्या पटावर डावपेचांची कसोटी पाहणाऱ्या एसबीआय लाइफ महाराष्ट्र राज्य शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत चुरस वाढू लागली आहे. स्पर्धेच्या चार फेऱ्यांनंतर सहा गटांतील तब्बल 17 खेळाडूंनी प्रत्येकी चार गुण मिळवत संयुक्त आघाडी घेतली आहे. सलग चार विजयांसह या खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांसमोर कडवे आव्हान उभे केले आहे.
दहिसर पश्चिम येथील रुस्तमजी केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये गुरुवारी झालेल्या लढतींनंतर सात वर्षांखालील खुल्या गटात पाच खेळाडूंमध्ये आघाडीची चुरस निर्माण झाली आहे. इवान दुबे (1545), अद्विक वर्मा (1447), आरुष अभिषेक माळकर (1469), अक्ष श्रीवास्तव (1513) आणि युवांश निमजा (1453) यांनी प्रत्येकी चार गुण मिळवत संयुक्त अव्वल स्थान पटकावले. मुलींच्या याच वयोगटात अग्रमानांकित लिया कृष्णन (1558) आणि द्वितीय मानांकित तनिष्का भंडारी (1477) यांनीही सलग विजय मिळवले.
अकरा वर्षांखालील खुल्या गटात अगस्त्य कसाट (1527), प्रियांश जैन (1514), एएफएम शिवांश कारिया (1506) आणि कौशिक रायते (1490) यांनी प्रत्येकी चार गुणांसह संयुक्त आघाडी घेतली. मुलींच्या गटात अग्रमानांकित त्वेशा आशिष जैन (1697) आणि द्वितीय मानांकित आश्वी अग्रवाल (1634) यांच्यात अव्वल स्थानासाठी चुरस रंगली आहे. दोघींनीही चार गुणांची कमाई केली आहे.
पंधरा वर्षांखालील खुल्या गटात विहान अग्रवाल (1858) आणि युवराज सिंह (1690) यांनी प्रत्येकी चार गुण मिळवत संयुक्त आघाडी घेतली. विहानने एएफएम आरुष सरोदेवर, तर युवराजने हृषान सिंग सजवानवर मात केली. मात्र, अग्रमानांकित संविद पसबोला (1912), एएफएम रायन मर्चंट (1822) आणि वरद मोरे (1697) हे साडेतीन गुणांसह विजेतेपदाच्या शर्यतीत कायम आहेत. त्यामुळे आगामी फेऱ्यांमध्ये आघाडीचे चित्र बदलण्याची शक्यता आहे.
पंधरा वर्षांखालील मुलींच्या गटात खानक पहारिया (1588) आणि महुआ देशपांडे (1527) यांनी प्रत्येकी चार गुण मिळवत संयुक्त आघाडी घेतली आहे. अग्रमानांकित एएफएम मायशा परवेझ (1991) तीन गुणांसह त्यांचा पाठलाग करत आहे. त्यामुळे या गटातील पुढील लढतींकडे लक्ष लागले आहे.
इंडियन चेस स्कूलच्या आयोजनाखाली सुरू असलेल्या या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात सहा फिडे मानांकित गटांत एकूण 417 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. सात, अकरा आणि पंधरा वर्षांखालील वयोगटांतील खुल्या आणि मुलींच्या विभागांत ही स्पर्धा होत आहे. प्रत्येक फेरीनंतर गुणतालिकेतील समीकरणे बदलण्याची शक्यता असल्याने पुढील डावांमध्ये कोण बाजी मारणार, याची उत्सुकता वाढली आहे.
Ans: चार फेऱ्यांनंतर सहा गटांतील एकूण 17 खेळाडूंनी प्रत्येकी चार गुण मिळवत संयुक्त आघाडी घेतली आहे.
Ans: इवान दुबे, अद्विक वर्मा, आरुष अभिषेक माळकर, अक्ष श्रीवास्तव आणि युवांश निमजा हे पाच खेळाडू चार गुणांसह संयुक्त आघाडीवर आहेत.
Ans: अगस्त्य कसाट, प्रियांश जैन, एएफएम शिवांश कारिया आणि कौशिक रायते यांनी प्रत्येकी चार गुण मिळवले आहेत.