
Chess Championship : महाराष्ट्रातील 800 युवा बुद्धिबळपटूंचा महासंग्राम! बुधवारपासून राज्य अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात
बुद्धिबळाच्या पटावर डावपेचांची लढाई रंगविण्यासाठी महाराष्ट्रातील 800 हून अधिक युवा बुद्धिबळपटू सज्ज झाले आहेत. इंडियन चेस स्कूलतर्फे आणि रुस्तमजी केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल, दहिसर यांच्या यजमानपदाखाली आयोजित एसबीआय लाइफ महाराष्ट्र राज्य शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेला (Chess Championship) यंदा विक्रमी प्रतिसाद लाभला आहे. राज्यातील 500 हून अधिक शाळांमधील खेळाडूंचा सहभाग असलेली ही स्पर्धा 4 ते 6 आणि 13 ते 15 नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांत रंगणार आहे.
सात, नऊ, 11, 13, 15 आणि 17 वर्षांखालील वयोगटांत मुलांचे आणि मुलींचे स्वतंत्र असे एकूण 12 गट असतील. विशेष म्हणजे, 400 हून अधिक फिडे मानांकित खेळाडू या बुद्धिबळाच्या रणांगणात उतरतील. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके जिंकलेल्या खेळाडूंचाही समावेश असल्याने प्रत्येक डावात चुरस आणि डावपेचांची कसोटी पाहायला मिळणार आहे.
स्विस लीग पद्धतीने सात फेऱ्यांत होणाऱ्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूला 60 मिनिटे आणि प्रत्येक चालीसाठी 30 सेकंदांची वाढ मिळेल. प्रत्येक गटातील अव्वल दोन खेळाडूंना डिसेंबरमध्ये अहमदाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.
विजेत्यांसाठी एक लाख 20 हजार रुपयांची रोख पारितोषिके, 36 चषक आणि 120 पदकांची लयलूट असेल. अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना आणि मुंबई उपनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेची मान्यता या स्पर्धेला आहे. सर्व 12 गट फिडे मानांकित असून कामगिरीची आंतरराष्ट्रीय मानांकनासाठी नोंद होणार आहे. फिडेचा प्रतिष्ठेचा ‘बी’ श्रेणीचा दर्जा मिळवलेले आंतरराष्ट्रीय पंच पी. बी. भिलारे मुख्य पंच म्हणून काम पाहतील.
Tri Series : सुधारेल तो पाकिस्तान कुठला, फायनलमध्येही चुकला, आयसीसीकडून दंडात्मक कारवाई
डीजीटी इलेक्ट्रॉनिक बुद्धिबळ पटांद्वारे सामन्यांचे थेट प्रक्षेपण, तसेच नामवंत तज्ज्ञांचे समालोचन आणि विश्लेषण हे स्पर्धेचे खास आकर्षण ठरणार आहे. एसबीआय लाइफचे इंडियन चेस स्कूलच्या स्पर्धांना मिळणारे हे सातवे प्रायोजकत्व आहे. युवा बुद्धिबळपटूंना राष्ट्रीय स्तरावर झेप घेण्याची संधी देणारा हा महासंग्राम आता कोण चेकमेट करणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Lionel Messi : मेस्सीची जादू, इंटर मियामीचा न्यू इंग्लंडवर दणदणीत विजय
Ans: एसबीआय लाइफ महाराष्ट्र राज्य शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा 4 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून ती दोन टप्प्यांत पार पडेल. दुसरा टप्पा 13 ते 15 नोव्हेंबरदरम्यान होईल.
Ans: या स्पर्धेत महाराष्ट्रातील 500 हून अधिक शाळांमधील 800 पेक्षा अधिक युवा बुद्धिबळपटू सहभागी होणार आहेत.
Ans: प्रत्येक गटातील अव्वल दोन खेळाडूंना डिसेंबरमध्ये अहमदाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल.