Kieron Pollard sets another record! Second player in the world to achieve this feat in T20 cricket..
Kieron Pollard creates history in T20 : वेस्ट इंडिजचे खेळाडू म्हटले टी २० स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जातात, टी २० क्रिकेटमधील अनेक विक्रम याच खेळाडूंच्या नावे आहेत. अशातच आता वेस्ट इंडिजचा अनुभवी फलंदाज किरॉन पोलार्डने एक मोठी कामगिरी करून दाखवली आहे. तो टी-२० क्रिकेटमध्ये १४००० धावा करणारा जगातील दुसराच क्रिकेटपटू ठरला आहे. कॅरिबियन प्रीमियर लीगच्या १६ व्या सामन्यात किरॉन पोलार्डने हा पराक्रम केला आहे.
या कामगिरीसह किरॉन पोलार्ड टी-२० च्या विशेष यादीत ख्रिस गेलच्या सोबत आला आहे. पोलार्डला १४,००० धावा पूर्ण करण्यासाठी १९ धावांची गरज होती. पोलार्डने त्रिनिदादच्या तारौबा येथील ब्रायन लारा स्टेडियमवर बार्बाडोस रॉयल्सविरुद्ध सीपीएल २०२५ च्या १६ व्या लीग सामन्यात ट्रिनबागो नाईट रायडर्सकडून खेळताना नऊ चेंडूत नाबाद १९ धावा फटकावून ही किमया साधली आहे.
हेही वाचा : आशिया कप वादानंतर पाकिस्तानची नमती भूमिका! हॉकी विश्वचषकासाठी भारतातील मैदानात खेळणार
वेस्ट इंडिजच्या महान खेळाडू ख्रिस गेलने ४६३ सामन्यांमध्ये १४,५६२ धावा करत आपल्या टी-२० कारकिर्दीला निरोप दिला आहे. तर पोलार्डने ७१२ सामन्यांमध्ये १४,००० धावा करत दुसरे स्थान पटकावले आहे. पोलार्डने खेळाच्या सर्वात लहान स्वरूपात एक शतक आणि ६४ अर्धशतके झळकावली आहेत.
किरॉन पोलार्डने वेस्ट इंडिजकडून खेळताना १०१ टी-२० सामन्यांमध्ये एकूण १५६९ धावा केल्या आहेत. त्याच वेळी, त्याने मुंबई इंडियन्ससाठी १८९ आयपीएल सामन्यांमध्ये एकूण ३४१२ धावा फटकावल्या आहेत. कॅरिबियन प्रीमियर लीग (सीपीएल) मध्ये, पोलार्डने १३० सामन्यांमध्ये २९५५ धावा काढल्या आहेत. पोलार्डने २००६ ते २०२५ या कालावधीत टी-२० मध्ये १९ संघांकडून (वेस्ट इंडिजसह) खेळला आहे. टी २० मध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू असणाऱ्या पोलार्डने ३३२ फलंदाजांना माघारी पाठवले आहे.
शनिवारी क्रीजवर असताना, पोलार्डने दोन चौकार आणि एक षटकार लागवला. या षटकारासह त्याने सीपीएलमध्ये सर्वाधिक षटकार देखील लगावले आहे.पोलार्ड आता सीपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू देखील बनला आहे.
टीकेआरकडून कॉलिन मुनरो आणि निकोलस पूरन यांच्या अर्धशतकांमुळे संघाने १७.५ षटकांत १७९ धावांचे लक्ष्य सहज गाठले आणि सामना ७ विकेट्सने आपल्या खिशात टाकला. मुनरोने ४४ चेंडूंचा सामना करत ६७ धावा केल्या. त्याने ४ चौकार आणि ४ षटकार मारले. तर पूरनने ४० चेंडूंमध्ये६५ धावांची खेळी केली. यामध्ये १ चौकार आणि ६ षटकार लगावले.