आशिया कप ट्रॉफी(फोटो-सोशल मीडिया)
Asia Cup 2025 new date set : आशिया कप २०२५ स्पर्धेला ९ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेपूर्वी मोठी अपडेट समोर आली आहे. आशिया कपमधील सामने आता भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होणार आहेत. आशियाई क्रिकेट परिषदेकडून शनिवार ३० ऑगस्ट रोजी हा बदल जाहीर करण्यता आला आहे. या स्पर्धेतील सर्व सामने दुबई आणि अबू धाबी येथे खेळवण्यात येणार आहेत.
पूर्वी एसीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, आशिया कपमधील सामने हे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होणार होते. परंतु आता वेळ बदलण्यात आली असून ७:३० वाजता सुरू होणारा सामना रात्री ८ वाजता सुरू होणार आहे. तथापि, १५ सप्टेंबर रोजी अबू धाबी येथे यूएई आणि ओमान यांच्यातील सामना स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ४:०० वाजता (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ५:३० वाजता) सुरू होणार आहे.
हेही वाचा : आशिया कप वादानंतर पाकिस्तानची नमती भूमिका! हॉकी विश्वचषकासाठी भारतातील मैदानात खेळणार
दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रविवार, १४ सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान हा आशिया कप २०२५ मधील हाय-व्होल्टेज सामना खेळवला जाणार आहे. हा सामना देखील रात्री ८ वाजता सुरू होणार आहे. आशिया कप २०२५ मध्ये भारताचा पहिला ग्रुप अ सामना संयुक्त अरब अमिराती विरुद्ध १० सप्टेंबर रोजी दुबई येथे खेळवण्यात येईल. तर ग्रुप स्टेजचा शेवटचा सामना ओमान विरुद्ध १९ सप्टेंबर रोजी अबू धाबी येथे खेळला जाणार आहे.
हेही वाचा : US Open 2025 : नोवाक जोकोविचने रचला इतिहास! ब्रिटिश खेळाडू कॅमेरॉन नारीचा पराभव करत चौथ्या फेरीत प्रवेश
आशिया कप २०२५ मध्ये भारत, पाकिस्तान, युएई आणि ओमान हे संघ ग्रुप अ मध्ये आहेत. तर श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग या संघाचा ग्रुप ब मध्ये समावेश आहे. प्रत्येक ग्रुपमधील टॉप दोन संघ सुपर फोरसाठी पात्र ठरणार आहेत. सुपर फोरचा एक सामना (२२ सप्टेंबर रोजी A2 आणि B1 दरम्यान) देखील अबू धाबी येथे होणार आहे. तर उर्वरित पाच सुपर फोर सामने आणि अंतिम सामना (२८ सप्टेंबर रोजी) दुबई येथे खेळवण्यात येणार आहे. ग्रुप ब मधील सहा पैकी पाच सामने आणि ग्रुप अ चे दोन सामने (यूएई विरुद्ध ओमान आणि भारत विरुद्ध ओमान) अबू धाबी येथे खेळवण्यात येणार आहेत.