
Dilip Vengsarkar : क्रिकेटमध्ये कौशल्यासोबत मेहनत, शिस्तही महत्त्वाची; दिलीप वेंगसरकर यांचा युवा खेळाडूंना कानमंत्र
क्रिकेटमध्ये केवळ कौशल्य असून चालत नाही, तर त्याला कठोर मेहनत, शिस्त आणि समर्पणाची जोड असणे आवश्यक आहे. या गुणांच्या जोरावरच खेळाडू यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो, असे मत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar ) यांनी व्यक्त केले. चेंबूर-माहुल येथील वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या मैदानावर आयोजित ए. वाय. एम. सिंटेक्स १६ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.
यावेळी मुंबईच्या १९ वर्षांखालील निवड समितीचे अध्यक्ष मंदार फडके यांनीही युवा क्रिकेटपटूंना मोलाचा सल्ला दिला. क्रिकेटचा कोणताही सामना खेळताना फलंदाजीत शतकी खेळी आणि गोलंदाजीत पाच बळी मिळविण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. निवड समिती खेळाडूंची निवड करताना फलंदाज सातत्याने मोठ्या धावा करतो का आणि गोलंदाज पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी मिळवतो का, याकडे प्रामुख्याने लक्ष देते, असेही फडके यांनी स्पष्ट केले.
वेंगसरकर यांनी फडके यांच्या विचारांना दुजोरा देताना खेळाडूंनी मैदानावरील कौशल्याबरोबरच मेहनत, शिस्त आणि समर्पणाची भावना जोपासण्याचे आवाहन केले.
दरम्यान, स्पर्धेच्या अंतिम सामन्यात क्रिकेट मंत्रास संघाने सुलक्षण कुलकर्णी क्रिकेट अकादमी संघाचा तीन विकेट्सने पराभव करत अजिंक्यपद पटकावले. प्रथम फलंदाजी करताना सुलक्षण कुलकर्णी क्रिकेट अकादमीचा डाव अवघ्या ८७ धावांत आटोपला. ४० षटकांच्या या सामन्यात त्यांचा संघ २२.४ षटकांत सर्वबाद झाला.
स्वर भोसलेने ३५ धावांत पाच, तर शौर्य नवलेने २६ धावांत चार बळी मिळवत प्रतिस्पर्ध्यांच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. हर्ष मेनन (१२), धीर छाजेर (११) आणि अर्णव कोरे (नाबाद १५) यांनाच दोन आकडी धावसंख्या गाठता आली.
प्रत्युत्तरात क्रिकेट मंत्रास संघाने नील भट्ट (१३) आणि धार्मिक प्रभू (२६) यांच्या ४४ धावांच्या सलामीच्या जोरावर चांगली सुरुवात केली. मात्र, त्यानंतर संघाची अवस्था पाच बाद ५३ अशी झाली. त्यामुळे सामन्यात रंगत निर्माण झाली. अशा परिस्थितीत शौर्य नवलेने नाबाद १२ धावांची खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. क्रिकेट मंत्रासने २२.४ षटकांत सात बाद ८८ धावा करत विजेतेपदावर नाव कोरले.
Usman Khawaja : कानाजवळ आला अन् वर्णद्वेषी टिपण्णी… उस्मान ख्वाजानं लॉर्ड्समधील तो धक्कादायक प्रसंग सांगितला
सुलक्षण कुलकर्णी क्रिकेट अकादमीकडून तनिश साळीने २० धावांत चार, तर आर्यन मंदोराने १९ धावांत तीन बळी घेत प्रभावी गोलंदाजी केली. मात्र, त्यांचे प्रयत्न संघाला विजय मिळवून देण्यासाठी अपुरे ठरले.
सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार स्वर भोसले याला देण्यात आला. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून एमसीसी, सांताक्रूझ संघाच्या निसर्ग चौधरीची निवड करण्यात आली. सर्वोत्तम फलंदाजाचा पुरस्कार १९५ धावा करणाऱ्या वेंगसरकर क्रिकेट अकादमी, माहुलच्या कुशल सातार्डेकर याला, तर सर्वोत्तम गोलंदाजाचा पुरस्कार सुलक्षण कुलकर्णी क्रिकेट अकादमीच्या आर्यन मंदोराला मिळाला. क्रिकेट मंत्रासच्या नील भट्टने सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार पटकावला.
Sachin Tendulkar : सचिनच्या बॅट्स सांगणार क्रिकेटमधील सुवर्णकथा; मुंबईत ‘बॅटोग्राफी’ चा अनोखा संगम
मुंबईच्या १९ वर्षांखालील निवड समितीचे अध्यक्ष मंदार फडके आणि भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते विजेत्या संघासह वैयक्तिक पुरस्कार विजेत्यांचा गौरव करण्यात आला.
Ans: क्रिकेट कौशल्यासोबत कठोर मेहनत, शिस्त आणि खेळाप्रती समर्पणाची भावना असणे आवश्यक असल्याचा सल्ला त्यांनी दिला.
Ans: क्रिकेट मंत्रास संघाने अंतिम सामन्यात सुलक्षण कुलकर्णी क्रिकेट अकादमीचा तीन विकेट्सने पराभव करून विजेतेपद मिळवले.
Ans: एमसीसी, सांताक्रूझ संघाच्या निसर्ग चौधरी याला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला.