Usman Khawaja : कानाजवळ आला अन् वर्णद्वेषी टिपण्णी... उस्मान ख्वाजानं लॉर्ड्समधील तो धक्कादायक प्रसंग सांगितला, सौजन्य : आयएएनएस
क्रिकेटच्या प्रतिष्ठित लॉर्ड्स मैदानावर २०२३ मध्ये झालेल्या अॅशेस मालिकेदरम्यान आपल्याला वर्णद्वेषी टिप्पणीचा सामना करावा लागल्याचा खळबळजनक खुलासा ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) याने केला आहे. आपल्या ‘सब्र’ या आत्मचरित्रातून त्याने या घटनेचा तपशील मांडला आहे.
इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टो याच्या वादग्रस्त स्टम्पिंगनंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतत असताना मेरीलेबोन क्रिकेट क्लबच्या (एमसीसी) एका सदस्याने आपल्याला वर्णद्वेषी शिवी दिल्याचा आरोप ख्वाजाने केला आहे.
ही घटना २०२३ च्या अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी लंचच्या विश्रांतीदरम्यान घडली होती. त्या वेळी ऑस्ट्रेलियन खेळाडू मैदानावरून लॉर्ड्सच्या प्रसिद्ध लॉन्ग रूममधून पॅव्हेलियनकडे परतत होते. बेअरस्टोच्या वादग्रस्त स्टम्पिंगमुळे सामन्यात आधीच वातावरण तापले होते. त्यातच प्रेक्षकांकडून ऑस्ट्रेलियन खेळाडूंना हूटिंग आणि शिवीगाळ केली जात होती. याच दरम्यान एमसीसीच्या काही सदस्यांनीही खेळाडूंना अपशब्द वापरल्याचे ख्वाजाने आपल्या पुस्तकात नमूद केले आहे.
क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, या घटनेचे पडसाद त्यावेळी मैदानावरही उमटले होते. स्काय स्पोर्ट्सच्या प्रक्षेपणादरम्यान ख्वाजा एका एमसीसी सदस्याशी वाद घालताना दिसला होता. तसेच अवे ड्रेसिंग रूमकडे जाण्यापूर्वी त्याने अन्य एका सदस्याबाबत सुरक्षारक्षकांकडे तक्रार केल्याचेही चित्रणात दिसले होते.
वाढदिवशी Sanju Samson ला खास गिफ्ट! केरळच्या कर्णधारपदाची मिळाली जबाबदारी, आता सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान
ख्वाजाने आपल्या पुस्तकात लॉर्ड्समधील वातावरणाचे वर्णन करताना सांगितले की, एमसीसीचे काही सदस्य एकाच वेळी ऑस्ट्रेलियन खेळाडूंना शिवीगाळ करत होते. हा प्रकार पाहून सुरुवातीला आपल्याला धक्काच बसला आणि आपण हसलोही, असे त्याने म्हटले आहे. जगातील प्रतिष्ठित क्रिकेट क्लबच्या लॉन्ग रूममध्ये अशा प्रकारचे वर्तन घडत असल्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता.
खेळाडू पुढे जात असताना एका सदस्याने अगदी कानाजवळ येऊन ओरडल्याचे ख्वाजाने सांगितले. त्यावर त्याने संबंधित व्यक्तीला पुन्हा असे करण्याची हिंमत करू नकोस, असा इशारा दिला. मात्र, पुढे जात असताना दुसऱ्याच एका व्यक्तीने आपल्याला उद्देशून वर्णद्वेषी शिवी वापरल्याचे ऐकले आणि त्याचा संयम सुटला, असे त्याने आत्मचरित्रात नमूद केले आहे.
Sachin Tendulkar : सचिनच्या बॅट्स सांगणार क्रिकेटमधील सुवर्णकथा; मुंबईत ‘बॅटोग्राफी’ चा अनोखा संगम
या घटनेबाबत ख्वाजाने एक महत्त्वाची बाबही स्पष्ट केली आहे. वर्णद्वेषी टिप्पणी करणारी व्यक्ती नेमकी कोण होती, हे आपल्याला माहीत नसल्याचे त्याने सांगितले. ज्या पहिल्या सदस्याने आपल्यासमोर आरडाओरडा केला, त्यालाच आपण जबाबदार समजून त्याच्याशी सामना केला होता. संबंधित व्यक्ती आपल्या चेहऱ्यासमोर ओरडत होती आणि थुंकत होती. त्यामुळे सुरक्षारक्षकांना त्या व्यक्तीला बाहेर काढण्यास सांगितल्याचे ख्वाजाने लिहिले आहे.
या घटनेनंतर एमसीसीने तीन सदस्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली होती. चौकशीनंतर एका सदस्याला क्लबमधून काढून टाकण्यात आले, तर अन्य दोन सदस्यांना अनुक्रमे साडेचार वर्षे आणि अडीच वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. मात्र, ख्वाजाच्या म्हणण्यानुसार, वर्णद्वेषी टिप्पणी करणारी व्यक्ती नेमकी कोण होती, याची त्याला खात्री नव्हती. त्यामुळे या कारवाईतील सदस्यांपैकी नेमक्या कोणत्या व्यक्तीने ती टिप्पणी केली होती, हे निश्चितपणे सांगता येत नाही.
विशेष म्हणजे, या घटनेच्या वेळी ऑस्ट्रेलियाचा आणखी एक खेळाडू डेव्हिड वॉर्नरही ख्वाजासोबत होता. सदस्यांकडून खेळाडूंना त्रास दिला जात असल्याचे त्यानेही अनुभवले होते. जिन्यावरून जात असताना एका सदस्याने आपल्याला आणि वॉर्नरला पाय अडवून पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही ख्वाजाने आत्मचरित्रात केला आहे.
लॉर्ड्सवरील या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ४३ धावांनी पराभव केला होता. मात्र, जॉनी बेअरस्टोच्या स्टम्पिंगनंतर निर्माण झालेला वाद आणि लॉन्ग रूममधील खेळाडूंसोबतचे गैरवर्तन यामुळे हा सामना विशेष चर्चेत राहिला.
दरम्यान, ख्वाजाचे ‘सब्र’ हे आत्मचरित्र १० नोव्हेंबर रोजी प्रकाशित झाले असून त्यातून त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील अनेक वादग्रस्त आणि महत्त्वपूर्ण घटनांवर प्रकाश पडला आहे. लॉर्ड्समधील वर्णद्वेषी टिप्पणीचा आरोप हा त्यातील चर्चेत आलेल्या खुलाशांपैकी एक आहे.
Ans: २०२३ च्या अॅशेस मालिकेदरम्यान लॉर्ड्सच्या मैदानावर एमसीसीच्या एका सदस्याने आपल्यावर वर्णद्वेषी टिप्पणी केल्याचा आरोप ख्वाजाने केला आहे.
Ans: २०२३ मधील अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी लंचच्या वेळी ही घटना घडल्याचे ख्वाजाने सांगितले.
Ans: जॉनी बेअरस्टोच्या वादग्रस्त स्टम्पिंगनंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतत असताना त्यांना शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप आहे.






