
फोटो सौजन्य – X (ESPN)
वैभव सुर्यवंशीने केला पराक्रम : भारताचे ३ संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहेत. ज्यामध्ये वरिष्ठ संघ इंग्लंडसोबत ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. दुसरीकडे, महिला क्रिकेट संघही इंग्लंडमध्ये आहे आणि १९ वर्षांखालील संघ इंग्लंडसोबत एकदिवसीय मालिका खेळत आहे. ज्यामध्ये १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचाही समावेश आहे. या मालिकेत वैभव सूर्यवंशी फलंदाजीने धुमाकूळ घालत आहे, प्रत्येक सामन्यात त्याच्या बॅटमधून धावा निघताना दिसत आहेत. मालिकेतील चौथ्या सामन्यात वैभवने तुफानी शतक ठोकून इतिहास रचला.
चौथ्या युवा एकदिवसीय सामन्यात वैभवने फक्त ५२ चेंडूत शतक ठोकून इतिहास रचला. या मालिकेत, वैभव सूर्यवंशी फलंदाजीने चमक दाखवत आहे, प्रत्येक सामन्यात धावा करत आहे आणि यासह त्याने पाकिस्तानच्या कामरान गुलामला मागे टाकले आहे ज्याने युवा एकदिवसीय सामन्यात ५३ चेंडूत शतक केले होते.
वैभव सूर्यवंशी हा युवा एकदिवसीय सामन्यात शतक करणारा जगातील आणि भारताचा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम भारतीय खेळाडू म्हणून सरफराज खानच्या नावावर होता, ज्याने २०१३ मध्ये १५ वर्षे आणि ३३८ दिवसांच्या वयात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक केले होते. याशिवाय वैभवने बांगलादेशचा नजमुल हसन शांतो, बाबर आझम आणि पाकिस्तानचा हसन राजा यांना मागे टाकले.
आतापर्यंत हा विक्रम नझमुल हसन शांतो यांच्या नावावर होता, ज्यांनी १४ वर्षे २४१ दिवसांच्या वयात युवा एकदिवसीय सामन्यात शतक झळकावले होते. याशिवाय बाबर आझमने १५ वर्षे ४८ दिवसांच्या वयात शतक आणि हसन राजा यांनी १५ वर्षे २६७ दिवसांच्या वयात शतक झळकावले होते. आता वैभव सूर्यवंशीने १४ वर्षे १०० दिवसांच्या वयात शतक ठोकून या सर्व खेळाडूंना मागे टाकले आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने ५० षटकांत ३६३ धावा केल्या. यादरम्यान वैभव सूर्यवंशीने १३ चौकार आणि १० षटकारांसह १४३ धावांची खेळी केली. विहान मल्होत्राने १२१ चेंडूंत १५ चौकार आणि ३ षटकारांसह १२९ धावांची खेळी केली. नंतर, लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंड अंडर-१९ संघ ४५.३ षटकांत ३०८ धावांवर बाद झाला.