एकेकाळी भारतीय संघात राहून क्रिकेटचे मैदान गाजवणाऱ्या आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)यांच्यासह कारकिर्दीची सुरुवात करणारा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी (Vinod Kambli) याच्यावर सध्या मोठे संकट कोसळले आहे. विनोद कांबळी हा आर्थिक संकटात सापडला असून तो कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी सध्या नोकरीच्या शोधात आहे. त्याने स्वतः त्याच्या परिस्थितीबाबत एका वृत्तपत्राला मुलाखत देताना सांगितले.
मुलाखतीत विनोद कांबळी म्हणाला की, “मी एक निवृत्त झालेला क्रिकेटपटू आहे आणि पूर्णपणे बीसीसीआयच्या (BCCI) पेन्शनवर अवलंबून आहे. माझ्या उत्पन्नाचा एकमेव स्रोत बीसीसीआय आहे आणि त्यासाठी मी त्यांचा खूप आभारी आहे. याच पैशातून माझ्या कुटुंबाचा खर्च भागतो. मला नोकरीची गरज आहे. मुंबईने अमोल मजुमदार यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून ठेवले आहे. परंतु त्यांना माझी गरज असल्यास मी उपलब्ध आहे. मी मुंबईसाठी खेळलो आहे आणि म्हणूनच त्यांनी माझ्यासाठी काहीतरी कराव असं मला वाटतं.”
सचिन तेंडुलकर विषयी बोलताना विंडो कांबळी म्हणाला, “मी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे (MCA) गेलो होतो. मला माझे घर चालवायचे आहे. मी अनेकदा एमसीएला माझी गरज भासल्यास मी येईल, असे म्हणालोय. सचिन तेंडुलकरला माझ्या परिस्थितीची कल्पना आहे. त्याने याआधीही माझी मदत केलीये. त्याने माझ्याकडे तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकॅडमीची जबाबदारी सोपवली होती. तो माझा खूप चांगला मित्र आहे. मी आता त्याच्याकडून मदतीची आशा ठेवत नाही.”
विनोद कांबळीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द :
विनोद कांबळीने आपल्या कारकिर्दीत भारतासाठी १७ कसोटी आणि १०४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या १०८४ धावा आणि कसोटीत २४७७ धावा आहेत. लहानपणी तो सचिनसोबत क्रिकेट खेळायचा. त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवातही दमदार पद्धतीने केली होती. पण नंतर तो आपला फॉर्म कायम राखू शकला नाही आणि संघाबाहेर गेला.