
ICC Ranking: Not one, not two, but a remarkable five Indian players are at the top of the ICC rankings! Meanwhile, Surya is out of the top 10.
ICC Ranking : आयसीसीकडून तिन्ही फॉरमॅटची ताजी रँकिंग जाहीर करण्यात आली आहे. या क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी बाजी मारली आहे. यामध्ये एक नाही, दोन नाही तर पाच भारतीय खेळाडू या रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर विराजमान झालेले आहेत. कसोटी असो, एकदिवसीय असो किंवा टी-२० असो, तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय खेळाडूंनी आपले नाणे खणखणीत वाजवले आहे. रोहित शर्मा एकदिवसीय रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर असून कसोटी रँकिंगमध्ये जसप्रीत बुमराह हा पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. तर रवींद्र जडेजा हा कसोटी अष्टपैलू खेळाडू म्हणून पहिल्या क्रमांकावर आहे. टी-२० रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकाचा फलंदाज अभिषेक शर्मा आणि गोलंदाज वरुण चक्रवर्तीने देखील आपले पहिले स्थान कायम राखले आहे.
हेही वाचा : IPL 2026 : बलात्कार प्रकरणात यश दयालला दिलासा नाहीच; पॉक्सो न्यायालयाने जामीन फेटाळाला; RCB च्या चिंतेत वाढ
तथापि, भारतीय संघाचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवला या क्रमवारीत मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. दीर्घकाळ अनुपस्थितीनंतर तो टी-२० रँकिंगमध्ये पहिल्या १० मधून बाहेर फेकला गेला आहे. गेल्या दोन वर्षांत त्याची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. या वर्षी सूर्याने २१ टी-२० सामन्यांमध्ये १३ च्या सरासरीने फक्त २१८ धावाच केल्या आहेत. भारतीय कर्णधाराने अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत वाईट कामगिरी केली, त्याला चार डावांमध्ये फक्त ३४ धावाच करता आल्या. त्यामुळेच सूर्यकुमार यादव टी-२० क्रमवारीत सातत्याने घसरण होत आहे.
आयसीसी क्रमवारीत जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती यांचे देखील स्थान धोक्यात आले आहे.जसप्रीत बुमराह ८७९ रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर असला तरी अॅशेस मालिकेत फक्त एका सामन्यात चमकदार कामगिरी करणारा पॅट कमिन्स त्याच्या जवळ येऊन पोहचला आहे. या खेळाडूने चार गोलंदाजांना मागे टाकत ८४९ रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
वरुण चक्रवर्तीबद्दल सांगायचे झाले तर, तो टी-२० मध्ये नंबर वन गोलंदाज म्हणून विराजमान आहे. परंतु दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या त्याच्या उत्कृष्ट कामगिरीनंतरही त्याला १४ रेटिंग गुण गमवावे लागले. या खेळाडूचे रेटिंग पॉइंट्सची ८१८ वरून ८०४ वर घसरण झाली आहे. तथापि, वरुण आणि दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज जेकब डफी यांच्यात खूप मोठे अंतर असून आहे, जे भरून निघणे खूप कठीण असल्याचे सध्याचे चित्र आहे.