विराट कोहली(फोटो-सोशल मीडिया)
Vijay Hazare Trophy 2025 : भारताच्या देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धेत, विजय हजारे ट्रॉफीमध्ये अनेक सुपरस्टार खेळाडू खेळताना दिसत आहेत.बुधवारपासून सुरू झालेल्या देशांतर्गत स्पर्धेत दिग्गज फलंदाज विराट कोहली दिल्ली संघाचा भाग आहे, तर रोहित शर्मा मुंबईकडून खेळताना दिसत आहे. दिल्लीकडून खेळताना विराट कोहलीने ८३ चेंडूत शतक ठोकले आहे. प्रथम फलंदाजी करताना आंध्रने २९९ धावांचे लक्ष्य दिले होते. २९९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, चेस मास्टर म्हणूननापली ओळख निर्माण करणाऱ्या विराट कोहलीने ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. तर सिक्कीमविरुद्ध २३७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना,मुंबईकडून रोहित शर्माने ७१ चेंडूत आपले शतक लगावले. रोहितने ९४ चेंडूत १५५ धावांची वादळी खेळी केली, ज्यामध्ये त्याने १८ चौकार आणि ९ षटकार लगावले. तसेच विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर दिल्लीने आंध्रचा ४ विकेट्सने पराभव केला.
या सामन्यात विराट कोहलीने १०१ चेंडूत १३१ धावा केल्या. त्याने या खेळीत १४ चौकार आणि ३ षटकार मारले आणि तो बाद झाला. विराटने आर्या आणि नितीश राणासोबत शानदार भागीदारी रचून संघाचा विजय अधिक सोपा केला. आर्याने ४४ चेंडूत ७४ धावा केल्या यामध्ये त्याने ७ चौकार आणि ५ षटकार मारले. तर नितीश राणाने ५५ चेंडूत ७७ धावा केल्या. यामध्ये त्याने ९ चौकार आणि २ षटकार मारले आणि तो बाद झाला. त्यानंतर हर्ष त्यागी ४ धावा आणि सैनी ५ नाबाद राहून दिल्लीला ४ विकेट्सने विजय मिळून दिला.
मोठ्या विश्रांतीनंतर विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळणारा भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीने एक इतिहास रचला आहे. या स्टार भारतीय खेळाडूने आता खास टप्पा गाठला आहे. २०२५-२६ विजय हजारे ट्रॉफीमध्ये दिल्लीचा आंध्र विरुद्धचा पहिला सामना खेळत असलेल्या विराट कोहलीने मैदानावर उतरताच मोठा अध्याय लिहिला. बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स ग्राउंड-१ वर फलंदाजीसाठी येत असताना, त्याने चौकार मारून लिस्ट ए क्रिकेटमध्ये १६,००० धावा पूर्ण केल्या आहेत.






