
IND vs AUS: Australia sets India a target of 265 runs; Steve Smith shines, Mohammed Shami's impressive batting...
IND vs AUS : दुबईत आज चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या सेमी फायनलचा थरार सुरू असून भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आले आहेत. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाने स्टीव्हन स्मिथ आणि अॅलेक्स केरी या दोघांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतासमोर 265 धावांचे आव्हान ठेवले आहे. स्टीव्हन स्मिथने 96 चेंडूमध्ये 73 धावा केल्या तर अॅलेक्स केरीने 57 चेंडूमध्ये 61 धावा करत ऑस्ट्रेलियाला 264 धावापर्यंत पोहचवले. ऑस्ट्रेलियाने सर्वबाद 264 धावापर्यंत मजल मारली आहे. भारताकडून मोहम्मद शमीने 3 विकेट्स तर रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 2 विकेट्स मिळवल्या आहेत. भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवसाठी 265 धावा कराव्या लागणार आहेत.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ट्रॅविस हेड आणि कुपर कॉनली यांनी डावाची सुरवात केली. यावेळी टीम इंडियाकडून मोहम्मद शमी प्रथम गोलंदाजीस आला. ऑस्ट्रेलियाची सुरुवात निराशाजनक झाली. या सामन्यात शमीच्या गोलंदाजीवर कूपर कॉनोली यष्टीरक्षक केएल राहुलकडे झेल देत बाद झाला. यानंतर ट्रॅव्हिस हेडने सुरेख फलंदाजी केली. परंतु, वरुण चक्रवर्ती ओव्हरच्या दुसऱ्याच चेंडूवर शुभमन गिलच्या हाती कॅच देऊन तो आऊट झाला. भारतासाठी डोकेदुखी ठरणारा सलामीवीर ट्रॅव्हिस हेड मैदानावर जम बसवत असल्याचे दिसत असताना फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने त्याला माघारी पाठवले. चक्रवर्तीच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात शुभमन गिलकडे झेल देऊन बसला. हेडने 33 चेंडूमध्ये 39 धावा करून बाद झाला.
एका बाजूने स्टीव्हन स्मिथने चांगली फलंदाजी करत 96 चेंडूमध्ये 73 धावा केल्या. तर त्या नंतर आलेला मार्नस लाबुशेन जास्त वेळ मैदानात तग धरू शकला नाही. त्याला जडेजाने आपल्या फिरकीत ओढले. तो 36 चेंडूमध्ये 29 धावा करून तंबूत परतला. त्यांनंतर फलंदाजीला आलेला जोश इंग्लिश 12 चेंडूमध्ये 11 धावा करून माघारी परतला. त्याला रवींद्र जाडेजाने बाद केले. त्यानंतर आलेला अॅलेक्स केरीने मात्र सुरेख फलंदाजी केली. त्याने 57 चेंडूमध्ये 61 धावा करत ऑस्ट्रेलियाला सन्मानजनक धावसंख्या उभारण्यास मदत केली. त्याला श्रेयस अय्यरने धाव बाद केले. ग्लेन मॅक्सवेलला आजच्या सामन्यात फार काही करता आले नाही. तो 7 रन्स काढून अक्षर पटेलचा शिकार ठरला.
बेन द्वारशियसने काही फटके मारण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला वरुण चक्रवर्तीने 19 धावांवर माघारी पाठवले. तसेच अॅडम झांपाने 7 धावा, नॅथन एलिसने 10 धावा आणि तनवीर संघा 1 धाव करून नाबाद राहील.
भारताकडून टिच्चून गोलंदाजी करण्यात आली. मोहम्मद शामीने 48 धावा देत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या तर मागील सामन्यात 5 विकेट्स घेणाऱ्या वरुण चक्रवर्तीने आणि रविद्र जडेजाने प्रत्येकी 2 विकेट्स मिळवल्या. तसेच अक्षर पटेल आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी 1 विकेट्स घेतली. तर कुलदीप यादवची झोळी मात्र रिकामीच राहिली. भारताने हा सामना जिंकला तर भारत थेट अंतिम सामन्यात पोहचेल. उद्या 5 मार्चला होणाऱ्या ब गटातील सेमी फायनल संघातील विजेत्या संघासोबत भारत 9 मार्चला अंतिम सामना खेळेल.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली , श्रेयस अय्यर , अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शामी आणि वरुण चक्रवर्ती
ट्रॅव्हिस हेड, कूपर क्रोनाली, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिश (विकेटकिपर), अॅलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशियस, नॅथन एलिस, अॅडम झांपा, तनवीर संघा