
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये काल मालिकेचा पहिला सामना खेळवण्यात आला. या सामन्यामध्ये भारतीय संघाची सुरूवात फार काही चांगली झाली नाही पण त्यानंतर न्यूझीलंडच्या संघासाठी अभिषेक शर्मा नावाचे वादळ आले आणि त्याने किवी संघाला उद्धवस्त केले. टीम इंडियाचा स्टार सलामीवीर अभिषेक शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात धुमाकूळ घातला. त्याने फक्त ३५ चेंडूत ८४ धावा करून भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या स्फोटक खेळीसाठी अभिषेकला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
सामन्यानंतर केवळ भारतीयच नाही तर न्यूझीलंडच्या खेळाडूंनीही अभिषेकचे कौतुक केले. नागपूर टी-२० सामन्यात भारताविरुद्ध अर्धशतक झळकावणारा न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन फिलिप्स म्हणाला की, जेव्हा अभिषेक शर्मासारखे खेळाडू अशा फॉर्ममध्ये असतात तेव्हा तुम्हाला नशिबाचीही थोडीशी साथ हवी असते.
“तो आयपीएलमध्ये जगातील काही वेगवान गोलंदाजांसोबतही असेच वागतो आहे. जेव्हा एखादा खेळाडू अशा फॉर्ममध्ये असतो तेव्हा तुम्हाला फक्त सर्वोत्तम क्षेत्रात चेंडू टाकायचा असतो आणि आशा असते की तो चूक करेल,” असे ग्लेन फिलिप्स पहिल्या टी-२० नंतर पत्रकार परिषदेत म्हणाले.
तो पुढे म्हणाला, “अर्थातच, तुमच्याकडे तुमच्या योजना असतात आणि तुम्ही त्या तुमच्या क्षमतेनुसार अंमलात आणण्याचा प्रयत्न करता. पण कधीकधी, अशा परिस्थितीत, तुम्हाला थोडीशी नशीबाचीही गरज असते.” न्यूझीलंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना भारताने २३८ धावा केल्या. अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्याने अनुक्रमे ३२ आणि २५ धावा केल्या. रिंकू सिंगने २० चेंडूत ४४ धावा करत भारतीय डावाला अंतिम टच दिला.
२३९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडला २० षटकांत ७ बाद १९० धावाच करता आल्या. ग्लेन फिलिप्सने ७८ धावांची शानदार खेळी केली, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. भारताने हा सामना ४८ धावांनी जिंकला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. विश्वचषकाआधी भारतीय संघासाठी खेळाडूंचे फार्ममध्ये असणे गरजेचे आहे. हे भारतीय संघाला विश्वचषक मिळवून देण्यात मदत करेल.