भारत विरुद्ध न्यूझीलंड-रोहित शर्मा : आज भारताचा संघ न्यूझीलंड सोबत भिडणार आहे. वनडे वर्ल्ड कप २०२३ चा आजचा सामना धर्मशाला येथील स्टेडिअम (Dhramshala Stadium) येथे सामना खेळवला जाणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) कडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. यंदाच्या विश्वचषकात रोहित उत्कृष्ट कामगिरी करताना दिसत आहे. रोहित शर्माला त्याचा दमदार फॉर्म कायम ठेवणं गरजेचं आहे. कर्णधार रोहित शर्मा नव्या विक्रमाला गवसणी घालण्यापासून अवघे काही पाऊलं दूर आहे.
रोहित शर्मा या सामन्यात आणखी एक दमदार विक्रम आपल्या नावे करू शकतो, यासाठी त्याला एक दमदार खेळीची आवश्यकता आहे. रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८००० धावांचा टप्पा गाठण्याचा विक्रम रचू शकतो. यासाठी त्याला फक्त ९३ धावांची गरज आहे. रोहित शर्माने आतापर्यंत ६६.२५ च्या रनरेटने २६५ धावा केल्या आहेत. रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण १७९०७ धावा केल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने ९३ किंवा त्याहून अधिक धावांची खेळी केली तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या १८००० धावा पूर्ण होतील. असे केल्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८००० धावा गाठणारा रोहित शर्मा २० वा फलंदाज ठरणार आहे.
विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आपले पाय भक्कम रोवण्याच्या दृष्टीने आजचा सामना जिंकणं दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाचं आहं. टीम इंडिया आणि न्यूझीलंड दोन्ही संघ सलग चार विजय मिळवल्यानंतर आजच्या सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी आतापर्यंतचे चारही सामने जिंकले असून दोन्ही संघांकडे समान आठ गुण आहेत.