Indian team enters semi-finals in first Kho Kho World Cup defeats Sri Lanka by 60 points
नवी दिल्ली : पहिल्या खो खो जागतिक विश्वचषक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत रामजी कश्यप, कर्णधार प्रतीक वाईकर आणि आदित्य गणपुले यांच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतीय पुरुष संघाने श्रीलंका संघाचा 100-40 असा धुव्वा उडवून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पहिल्याच सत्रात 58 गुणांची नोंद करीत श्रीलंकाचा धुव्वा
इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पहिल्या सत्रातच 58 गुणांची नोंद करणाऱ्या भारतीय पुरुष संघाने श्रीलंकेला ड्रीम रन द्वारा एकही गुणाची नोंद करू दिली नाही. प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेच्या पुरुषी संघाने दुसऱ्या सत्रात कडवी झुंज दिली. परंतु, अनिकेत पोटे व आदित्य गणपुले यांच्या सह रामजी कश्यपने बचावात अप्रतिम कामगिरी करूनही श्रीलंकेच्या आक्रमकांनी तोडीस तोड खेळ केला. त्यांनी भारतीय बचाव पटूना दुसऱ्या सत्रात स्थिरावू दिले नाही. मात्र पहिल्या सत्रातील भक्कम आघाडीमुळे भारताचे वर्चस्व कायम राहिले.
तिसऱ्या सत्रात प्रतीक वाईकरचा शानदार खेळ
तिसऱ्या सत्रात सिवा रेड्डी, व्ही सूब्रमणी आणि प्रतीक वाईकर यांनी स्काय डायव्हिंग आणि पोल डायव्हिंगचे अप्रतिम प्रात्यक्षिक दाखवताना श्रीलंकेची बचाव फळी मोडून काढली. तिसरे सत्र संपण्याच्या आतच गुणांचे शतक ओलांडताना भारतीय संघाने उपांत्य फेरीची निश्चिती केली होती.
चौथ्या सत्रात 40 गुणांची मजल
अखेरच्या चौथ्या सत्रात पाबणी साबर, अनिकेत पोटे आणि सिवा रेड्डी या भारताच्या पहिल्या तुकडीनेच अभेद्य बचाव करताना श्रीलंकेच्या आक्रमकांना रोखून धरले. परिणामी श्रीलंकेला जेमतेम 40 गुणांची मजल मारता आली.
पारितोषिके
सर्वोत्कृष्ट बचाव पटू: सूब्रमणी (भारत)
सर्वोत्कृष्ट आक्रमक खेळाडू: ससिनाडू (श्रीलंका)
सामनावीर:रामजी कश्यप