
T Natarajan back with SRH,
गेल्या दोन आयपीएल हंगामात नटराजनला दिल्लीकडून खेळण्याची फारशी संधी मिळाली नाही. आता तो त्याच्या पूर्वीच्या फ्रँचायझी, एसआरएचमध्ये परतला आहे. त्याच्या आगमनामुळे हैदराबादला देशांतर्गत क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाजीचा एक मजबूत पर्याय मिळाला आहे. आयपीएल २०२७ च्या आधी दिल्लीचा हा दुसरा ट्रेड डील आहे. यापूर्वी, फ्रँचायझीने कुलदीप यादवच्या बदल्यात लखनौ सुपर जायंट्स (LSG) सोबत ऋषभ पंतला करारबद्ध केले होते.
आयपीएल २०२५ च्या आधी, दिल्ली कॅपिटल्सने टी. नटराजनला संघात घेण्यासाठी १०.७५ कोटी रुपयांची मोठी रक्कम खर्च केली होती. मात्र, ही गुंतवणूक संघाच्या अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरली नाही. दुखापतींमुळे नटराजन दीर्घकाळ मैदानाबाहेर राहिला यामुळे त्याला खेळता आले नाही. आता तो जवळपास निम्म्या किमतीत, म्हणजेच ५ कोटी रुपयांना, सनरायझर्स हैदराबाद संघात परतत आहे. या करारामुळे नटराजनला त्याच्या पूर्वीच्या संघासोबत एक नवी सुरुवात करण्याची संधी मिळेल, तसेच एसआरएचला आपला वेगवान गोलंदाजी विभाग मजबूत करण्यास मदत होईल.
दरम्यान, कुलदीप यादवच्या जाण्यानंतर दिल्ली कॅपिटल्सला एका चांगल्या फिरकी गोलंदाजाची गरज होती. त्यामुळे, फ्रँचायझीने झीशान अन्सारीला संघात सामील केले आहे. ज्याला आयपीएलमधील सर्वात प्रतिभावान फिरकी गोलंदाजांपैकी एक मानले जाते. अन्सारी ४० लाख रुपयांच्या मूळ किमतीत दिल्ली संघात सामील झाला आहे. तर नटराजनला ५.७५ कोटी रुपयांना संघात घेण्यात आले आहे.
३५ वर्षीय टी नटराजनने दिल्ली कॅपिटल्सकडून दोन आयपीएल हंगामांमध्ये एकूण १२ सामने खेळून केवळ पाच विकेट्स घेतले. त्याच्या निराशाजनक कामगिरीमुळे आणि दुखापतीच्या समस्यांमुळे फ्रँचायझीने त्याला दुसऱ्या संघात पाठवण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी, नटराजन २०२० ते २०२४ या काळात सनरायझर्स हैदराबादकडून पाच हंगाम खेळला आहे. त्याने एसआरएचसाठी ५५ सामन्यांमध्ये ६५ विकेट्स घेतले आहेत. आयपीएल २०२४ हा त्याचा सर्वात यशस्वी हंगाम होता, ज्यात त्याने १९ विकेट्स घेतले. २०१७ मध्ये पंजाब किंग्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या नटराजनने आतापर्यंत एकूण ७३ सामने खेळून ७२ डावांमध्ये ७२ विकेट्स घेतले आहेत. या काळात त्याचा इकॉनॉमी रेट ९.२१ आहे.