
Maharashtra Kho Kho Team : राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र सज्ज; जितेंद्र वसावे, स्नेहा लामकानेकडे नेतृत्व
Maharashtra Kho Kho Team : गुजरातमधील वडोदरा येथे 21 ते 25 नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या 45 व्या कुमार-मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे दोन्ही संघ जाहीर झाले आहेत. कुमार संघाचे नेतृत्व धाराशिवच्या जितेंद्र वसावे याच्याकडे, तर मुलींच्या संघाची कर्णधारपदाची जबाबदारी सोलापूरच्या स्नेहा लामकाने हिच्याकडे सोपविण्यात आली आहे. राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याच्या निर्धाराने महाराष्ट्राचे खेळाडू मैदानात उतरणार आहेत.
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी दोन्ही संघांची घोषणा केली. संघनिवडीनंतर असोसिएशनच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार ॲड. गोविंद शर्मा आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रीय स्पर्धेच्या तयारीसाठी मुलींचे प्रशिक्षण शिबिर धाराशिव येथे, तर कुमार संघाचे शिबिर सांगली येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी कसून सराव केला. शारीरिक तंदुरुस्ती, वेग, चपळाई, आक्रमण-बचावातील कौशल्य आणि सांघिक समन्वयावर विशेष भर देण्यात आला.
World Tennis League : बेंगळुरूमध्ये रंगणार जागतिक टेनिसचा थरार; 17 डिसेंबरपासून वर्ल्ड टेनिस लीग
महाराष्ट्र कुमार संघात जितेंद्र वसावे (कर्णधार), हरदया वसावे, सोत्या वळवी (सर्व धाराशिव), समर्थ सावंत, अर्जुन सेहजराव, सचिन सहानी (सर्व मुंबई उपनगर), अकबर शेख, ओंकार राजपूत (सर्व सोलापूर), समर्थ चव्हाण, अद्वैत बैत (सर्व पुणे), पार्थ देवकते (सांगली), तबरेज खान (सातारा), विनायक भांगे, आशिष गौतम (सर्व ठाणे) आणि गौरव कुदळे (अहिल्यानगर) यांचा समावेश आहे.
राखीव खेळाडू म्हणून ओमकार सावंत (ठाणे), भीमसिंग वसावे (धाराशिव) आणि सुबोध चव्हाण (पुणे) यांची निवड झाली आहे. पंढरीनाथ बडगुजर (धुळे) मुख्य प्रशिक्षक, सुनील चव्हाण (सोलापूर) सहाय्यक प्रशिक्षक, तर मोहन राजपूत (सोलापूर) व्यवस्थापक म्हणून जबाबदारी सांभाळतील.
IND vs PAK: धुरळा उडणार! आरपारच्या लढाईत भारत-पाकिस्तान भिडणार; कधी अन् कुठे रंगणार महामुकाबला?
महाराष्ट्र मुलींच्या संघात स्नेहा लामकाने (कर्णधार), धनश्री तामखडे, वेदिका तामखडे, अनुष्का तामखडे (सर्व सांगली), धनश्री कंक, प्रणिती जगदाळे, गुड्डी राठोड (सर्व ठाणे), मैथिली पवार (धाराशिव), कल्याणी लामकाने, प्राजक्ता बनसोडे (सर्व सोलापूर), श्वेता नवले, अपर्णा वर्धे (सर्व पुणे), नंदिनी सिसोदीया (धुळे), अक्षरा सोळंके (सातारा) आणि आर्या भाटकर (मुंबई उपनगर) यांचा समावेश आहे.
राखीव खेळाडू म्हणून जयश्री पवार (नाशिक), भवरम्मा उटगी (सांगली) आणि स्वरांजली थोरात (धाराशिव) यांची निवड झाली आहे. अभिजित पाटील (धाराशिव) मुख्य प्रशिक्षक, समृद्धी पाटील (ठाणे) सहाय्यक प्रशिक्षिका, तर सुनिता राजपूत (सोलापूर) व्यवस्थापिका म्हणून काम पाहतील.
दोन्ही संघांनी प्रशिक्षण शिबिरांत चांगली तयारी केली असून, राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राची कामगिरी निश्चितच प्रभावी ठरेल, असा विश्वास सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी व्यक्त केला. आता वडोदऱ्यात होणाऱ्या स्पर्धेत महाराष्ट्राचे दोन्ही संघ सुवर्णपदकाची मोहीम यशस्वी करतात का, याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.