Michael Clarke : सॅण्डपेपर प्रकरणाची फेरचौकशी करा; 'आम्हाला सत्य माहीत नाही', मायकेल क्लार्कची मागणी,सौजन्य : आयएएनएस
२०१८ मधील ऑस्ट्रेलियन क्रिकेटला हादरवणाऱ्या सॅण्डपेपर प्रकरणावरून पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क (Michael Clarke) याने या प्रकरणाची फेरचौकशी करण्याची मागणी केली आहे. ‘आम्हाला नेमके सत्य माहीत नाही. जोपर्यंत चौकशी पुन्हा सुरू होत नाही आणि संपूर्ण सत्य समोर येत नाही, तोपर्यंत या प्रकरणावर पडदा पडणार नाही,’ असे स्पष्ट मत क्लार्कने व्यक्त केले.
ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर उस्मान ख्वाजा याने आपल्या ‘सब्र’ या नव्या पुस्तकातून २०१८ मधील केपटाऊन कसोटीतील चेंडू छेडछाड प्रकरणाबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. या घटनेची माहिती संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघाला होती, असा दावा ख्वाजाने पुस्तकात केला आहे. त्यानंतर या जुन्या प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
Hardik Pandya असेल ट्रेंडिंगचा विषय; मुंबई इंडियन्सने ट्रेंट बोल्टला सोडावे, आकाश चोप्राचा अजब गजब सल्ला
एका कार्यक्रमात बोलताना क्लार्क म्हणाला, “ऑस्ट्रेलियाचे चाहते अजूनही या प्रकरणातून बाहेर पडलेले नाहीत. त्यांना सत्यावर विश्वास ठेवता येत नाही, कारण त्यांना नेमके सत्य माहीतच नाही. जोपर्यंत चौकशी पुन्हा सुरू होत नाही आणि सत्य समोर येत नाही, तोपर्यंत या प्रकरणाचा शेवट होणार नाही.”
तो पुढे म्हणाला, “२०१८ मध्ये सत्य समोर आणण्याची संधी होती; मात्र तसे झाले नाही. २०२१ मध्ये कॅमेरून बॅनक्रॉफ्टने काही विधाने केली, तेव्हाही संधी होती. आता पुन्हा एकदा सत्य समोर आणण्याची संधी आहे. संबंधित प्रत्येकाला खरे बोलण्याची संधी मिळावी आणि या प्रकरणाचा कायमचा निकाल लागावा, अशी माझी इच्छा आहे.”
२०२१ मध्ये झालेल्या एका मुलाखतीत चेंडूशी छेडछाड करताना सँडपेपर लपवताना दिसलेल्या कॅमेरून बॅनक्रॉफ्टला या कटाची माहिती पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि नॅथन लायन यांना होती का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्याने ‘हे स्पष्ट आहे’, अशा आशयाचे उत्तर दिले होते.
मात्र, बॅनक्रॉफ्टच्या विधानानंतर कमिन्स, स्टार्क, हेझलवूड आणि लायन यांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले होते. चेंडूची स्थिती बदलण्यासाठी बेकायदेशीर बाह्य वस्तूचा वापर केला जात असल्याची आपल्याला कोणतीही माहिती नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले होते.
क्लार्कने या प्रकरणातील अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळाली नसल्याचे सांगितले. तो म्हणाला, “सध्या माझ्यासमोर उत्तरांपेक्षा प्रश्नच अधिक आहेत. सर्व खेळाडूंना या प्रकाराची माहिती होती का, हे मला जाणून घ्यायचे आहे. काही खेळाडूंनी आपल्याला काहीच माहीत नव्हते, असे सांगितले आहे. मग त्यांना खरोखरच माहिती नव्हती का? हा मुद्दा सत्य समोर येण्यासाठी महत्त्वाचा आहे. हा प्रकार पहिल्या सामन्यातही घडला होता का? कारण ही घटना केवळ केपटाऊनपुरती मर्यादित नव्हती, असेही ऐकायला मिळत आहे.”
दरम्यान, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉड ग्रीनबर्ग यांनी मंगळवारी रेडिओ स्टेशन ‘सेन’शी बोलताना या प्रकरणाची फेरचौकशी होणार नसल्याचे स्पष्ट केले. २०१८ मध्ये करण्यात आलेल्या चौकशीच्या निष्कर्षांवर क्रिकेट ऑस्ट्रेलिया समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले.
Rinku Singh Wedding: शुभमंगल सावधान! भारताचा स्टार खेळाडू अडकणार विवाहबंधनात, कुठे आणि केव्हा होणार लग्न?
२०१८ मध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात केपटाऊन येथे झालेल्या कसोटी सामन्यात चेंडूशी छेडछाड केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. तत्कालीन कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि फलंदाज कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांची नावे या प्रकरणात समोर आली होती. चेंडूची स्थिती बदलण्यासाठी सँडपेपरचा वापर केल्याचे उघड झाल्यानंतर क्रिकेटविश्वात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणानंतर स्मिथ, वॉर्नर आणि बॅनक्रॉफ्ट यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
या घटनेला आठ वर्षे उलटल्यानंतर उस्मान ख्वाजाने आपल्या ‘सब्र’ या पुस्तकातून संपूर्ण संघाला या प्रकाराची माहिती असल्याचा दावा केला आहे. त्यातच डेव्हिड वॉर्नरने ख्वाजाच्या विधानाला पाठिंबा दिल्याने या वादाला पुन्हा हवा मिळाली आहे.
Ans: ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क याने या प्रकरणाची फेरचौकशी करण्याची मागणी केली आहे.
Ans: २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील केपटाऊन कसोटी सामन्यादरम्यान चेंडूशी छेडछाड करण्याचा प्रकार घडला होता.
Ans: 'सब्र' या पुस्तकात ख्वाजाने चेंडूशी छेडछाड करण्याच्या घटनेची माहिती संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघाला होती, असा दावा केला आहे.






