राजेश पाटील गोकुळचे अध्यक्ष
Gokul Chairman Election 2026 : कोल्हापूरच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाचा अखेर फैसला झाला आहे. महायुतीचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीकडून शशिकांत पाटील-चुयेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, या लढतीत राजेश पाटील यांनी बाजी मारली. त्यामुळे गोकुळच्या सत्तेवर महायुतीने विजय प्राप्त केला आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली 10 नोव्हेंबर रोजी ही निवडणूक पार पडली. गोकुळच्या 25 निवडून आलेल्या संचालकांसह चार शासननियुक्त संचालकांनीही मतदानाचा हक्क बजावला. सुरुवातीपासूनच या निवडणुकीत शासननियुक्त संचालकांच्या मतदानावरून मोठा वाद निर्माण झाला होता.
सतेज पाटील यांनी या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, औरंगाबाद खंडपीठाने 10 नोव्हेंबरला निवडणूक घेण्यास परवानगी दिली होती. अंतिम निकाल न्यायालयातील प्रकरणाच्या निर्णयाच्या अधीन राहील, असेही निर्देश देण्यात आले होते.
राजेश नरसिंगराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आहेत. त्यांनी 2019 मध्ये चंदगड विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यांचे वडील नरसिंग गुरुनाथ पाटील हे देखील आमदार होते. त्यामुळे राजेश पाटील यांना राजकारणाचा वारसा लाभला आहे. हसन मुश्रीफ आणि दिवंगत अजित पवार यांचे विश्वासू नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे.
मात्र, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील यांनी त्यांचा पराभव केला. या पराभवाची अजित पवार यांनाही मोठी खंत होती.
राजेश पाटील यांच्या विजयाची चर्चा होत असताना अजित पवार यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. चंदगडमधील एका कार्यक्रमात बोलताना अजितदादांनी राजेश पाटील यांचा उल्लेख आपला ‘उजवा हात’ असा केला होता.
‘कुठे फेटा बांधतो, आपला उजवा हात राजेश पाटील पराभूत झालाय,’ अशा शब्दांत त्यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाची खंत व्यक्त केली होती. ‘आमचा गड आला महाराष्ट्रात, पण आमचा सिंह गेला,’ असं म्हणत त्यांनी राजेश पाटील यांच्या पराभवाचं दुःखही बोलून दाखवलं होतं.
गोकुळच्या मागील निवडणुकीत राजेश पाटील यांच्या पत्नी आणि संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर मंडलिक गटाकडून हसन मुश्रीफ यांच्यावर टीका करण्यात आली होती. मात्र, आता याच हसन मुश्रीफ यांच्या गटाकडून राजेश पाटील यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. त्यामुळे जुन्या राजकीय मतभेदांवर पडदा पडल्याचं चित्र आहे.
दरम्यान, 13 विरुद्ध 12 अशा संचालकांच्या संख्याबळात शासननियुक्त चार संचालकांच्या मतदानाचा मुद्दा निर्णायक ठरला. अखेर राजेश पाटील यांच्या विजयाने गोकुळच्या राजकारणात महायुतीने नवी खेळी यशस्वी केली आहे.
Ans: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि महायुतीचे उमेदवार राजेश नरसिंगराव पाटील यांची 10 नोव्हेंबर 2026 रोजी गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
Ans: सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीकडून शशिकांत पाटील-चुयेकर यांनी राजेश पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवली.
Ans: अजित पवार यांनी राजेश पाटील यांचा उल्लेख आपला 'उजवा हात' असा केला होता. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पराभवानंतर अजित पवार यांनी 'आमचा गड आला महाराष्ट्रात, पण आमचा सिंह गेला' अशी भावना व्यक्त केली होती.






