
MS Dhoni IPL Records : नेहमीच चेन्नईचा तारणहार ठरलाय एम. एस. धोनी; रेकॉर्ड पहाल तर थक्क व्हालं
MS Dhoni IPL Records : ज्याची वाटत होती भीती नेमकं तेच झालं. अखेर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व चेन्नई सुपर किंग्सचा तारणहार महेंद्रसिंह धोनीने आयपीएलमधून निवृत्ती घेतली. तो आता CSK मध्ये मेंटॉरच्या रुपात भूमिका बजावणार असून येथेही त्याच्याकडून संघ व्यवस्थापनाला मोठ्या अपेक्षा असतील.
पण एक मात्र चुकल्यासारखं वाटणार ते म्हणजे, धोनीची बॅटींग. संकटात सापडलेल्या चेन्नई सुपर किंग्सला धोनीने अनेकदा बाहेर काढत हातचे गेलेले सामना जिंकून दिले आहेत. एकदा दोनदा नव्हे तर तब्बल पाच वेळा त्याने CSK ला आयपीएलचे टायटल जिंकून दिले आहे. धोनीचा आयपीएलमधील रेकॉर्ड हा नेहमीच अविश्वसनीय राहिला आहे.
फलंदाजी, यष्टिरक्षण आणि कर्णधारपद अशा तिन्ही आघाड्यांवर त्याची कामगिरी उल्लेखनीय अशीच म्हणावी लागेल. खेळाडू म्हणून आयपीएलमधील कारकिर्दीला निरोप दिल्यानंतर आता धोनी चेन्नई सुपर किंग्सचा मार्गदर्शक असेल. असा मार्गदर्शक ज्याच्या मैदानातील उपस्थितीने अनेक खेळाडूंवर प्रभाव पडायचा. त्यामुळे CSK मधील खेळाडू हे नशिबवानच म्हणावे लागतील.
धोनी आपल्या आयपीएल कारकिर्दीत 278 सामने खेळला असून 38.30 च्या सरासरीने 5 हजार 439 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 24 अर्धशतके आहेत. याशिवाय त्याने 264 षटकार आणि 375 चौकार लगावले आहेत. आयपीएलमधील त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 84 आहे. विशेष म्हणजे, इतकी मोठी कारकीर्द असूनही धोनीला आयपीएलमध्ये एकही शतक झळकावता आले नाही.
2008 मध्ये झालेल्या पहिल्या आयपीएल लिलावात चेन्नई सुपर किंग्सने धोनीला 15 लाख डॉलरमध्ये आपल्या संघात घेतले होते. त्यानंतर तो चेन्नईच्या संघाचा महत्त्वाचा चेहरा बनला.
धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 अशी पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली. विशेष म्हणजे, 2010 आणि 2011 मध्ये सलग दोन हंगाम विजेतेपद मिळवून देत आयपीएल विजेतेपदाचा यशस्वी बचाव करणारा तो पहिला कर्णधार ठरला.
धोनीने आयपीएलमध्ये सर्वाधिक 235 सामन्यांत कर्णधारपद भूषवले. यापैकी 136 सामन्यांत त्याच्या संघाने विजय मिळवला. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईने तब्बल 10 वेळा अंतिम फेरी गाठली.
धोनीचे योगदान केवळ फलंदाजी आणि कर्णधारपदापुरते मर्यादित राहिले नाही. यष्टिरक्षक म्हणूनही त्याने मोठी कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये त्याने 158 झेल आणि 47 यष्टिचित अशा एकूण 205 खेळाडूंना बाद करण्यात योगदान दिले आहे. यष्टिरक्षक म्हणून आयपीएलमधील हा सर्वाधिक आकडा आहे.
कर्णधार म्हणून त्याने 218 षटकार लगावण्याचा विक्रमही नोंदवला आहे. फलंदाजीच्या क्रमवारीत वेगवेगळ्या पाच स्थानांवर खेळताना त्याने अर्धशतके झळकावली आहेत.
धोनीने आयपीएलमधील पाच विजेतेपदांसह चॅम्पियन्स लीग टी-20 स्पर्धेचे विजेतेपदही मिळवले आहे. त्यामुळे त्याच्या नावावर एकूण सात मोठ्या टी-20 ट्रॉफी जमा झाल्या आहेत. आयपीएल विजेतेपदांच्या बाबतीत तो रोहित शर्माच्या बरोबरीत आहे. मात्र, चॅम्पियन्स लीग टी-20 विजेतेपदामुळे एकूण ट्रॉफींच्या बाबतीत त्याची कामगिरी वेगळी ठरते.
7 जुलै 1981 रोजी रांची येथे जन्मलेल्या धोनीने 2008 पासून चेन्नईसोबतचा प्रवास सुरू केला. दोन वर्षांच्या निलंबनानंतर 2018 मध्ये संघाने पुनरागमन करत विजेतेपद पटकावले, तेव्हाही धोनीचे नेतृत्व महत्त्वाचे ठरले. शांत स्वभाव, सामन्याच्या अखेरच्या क्षणी विजय मिळवून देण्याची क्षमता आणि नेतृत्वगुण यामुळे धोनी चेन्नई सुपर किंग्सची ओळख बनला आहे.
Ans: धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 मध्ये अशी एकूण पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली.
Ans: आयपीएलमध्ये धोनीची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 84 धावा आहे.
Ans: धोनीने चेन्नई सुपर किंग्ससह पाच आयपीएल विजेतेपदे आणि दोन चॅम्पियन्स लीग टी-20 विजेतेपदांसह एकूण सात ट्रॉफी जिंकल्या आहेत, असा या वृत्तातील दावा आहे.