
Mumbai Mayor Cup School Chess Tournament
निर्णायक आणि पाचव्या फेरीत अपराजित अर्जुन कुलकर्णीने राजवीर विचारेच्या राजाला २१ व्या चालीला शह देत गटविजेतेपदाला गवसणी घातली. माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी विजेत्या खेळाडू अर्जुनला आकर्षक चषक आणि भेटवस्तू देऊन गौरविले. याप्रसंगी क्रीडापटू प्रमोद पार्टे, अशोक नवले, प्रशिक्षक राजाबाबू गजेंगी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी व्यक्ती उपस्थित होते.
मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना, सिबीइयुएम व आरएमएमएस सहकार्याने सुरु झालेल्या स्पर्धेमधील ११ वर्षाखालील गटातील पहिल्या पटावर प्रारंभी तुंबळ युध्द झाले. फिडे गुणांकित अहान काटरुकाच्या आक्रमक चालींना कैवल्य परबने तोडीस तोड प्रत्युत्तर देत अखेर बलाढ्य प्रतिस्पर्ध्यास बरोबरी करण्यास भाग पाडले. अहान काटरुकाने (४.५ गुण) प्रथम, कैवल्य परबने (४ गुण) द्वितीय, मृण्मयी डावरेने (४ गुण) तृतीय, सुजय सावंतने (३.५ गुण) चतुर्थ, आरव कदमने (३.५ गुण) पाचवा क्रमांक पटकाविला. ७ वर्षाखालील गटात अर्जुन कुलकर्णीने (५ गुण) प्रथम, आरोह चुघने (४ गुण) द्वितीय, अहान भट्टने (४ गुण) तृतीय, सात्विक पांडेने (४ गुण) चतुर्थ, राजवीर विचारेने (३.५ गुण) पाचवा पुरस्कार जिंकला.
या स्पर्धेमुळे शहरातील बुद्धिबळपटूंना आपले कौशल्य दाखविण्याची महत्त्वपूर्ण संधी मिळाली आहे. बुद्धिबळाच्या पटावर डावपेच, एकाग्रता आणि निर्णयक्षमता यांची कसोटी पाहणाऱ्या या स्पर्धेत लहान वयोगटातील खेळाडूंनी जिल्हा स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केली. अशा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाभावना, आत्मविश्वास विकसित होण्यास मदत होते.